Friday, 19 October 2018

मंदीर बनायेगा कौन?


मंदीर बनायेगा कौन?
काल म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी बऱ्याच सभा आणि कार्यक्रम गाजले.  त्यातले दोन कार्यक्रम म्हणजे एक नागपूरचा संघाचा कार्यक्रम आणि दुसरा म्हणजे मुंबईतला शिवसेनेचा दसरा मेळावा. संघाची भूमिका ही नेहमीच राम मंदीराच्या बाजूने राहीली आहे, नव्हे राम मंदीर उभं करण्यासाठी जे काही प्रयत्न करायचे ते प्रयत्न संघाच्या वतीनं केले जातायत, मात्र कालच्या कार्यक्रमात सरसंघचालकांनी पुन्हा राम मंदीराचा मुद्दा उपस्थित केला. तसंच शिवसेनेचा  संपूर्ण मेळावा जरी विनोदी असला तरी उध्दव ठाकरेंची २५ नोव्हेंबरला अयोध्येला जाणार असल्याची डराकाळी मात्र गंभीर आहे. अशातच काही दिवसांपूर्वी बाबराच्या कोण्या वंशजानं मंदीर बांधण्यासाठी न मागताच परवानगी दिल्याचंही कानावर आलं. शिय़ा समुदायाही राम मंदीराच्या बाजूने आहे म्हणे. आज काँग्रेसवालेही म्हणत होते की आम्हीच पहिल्यांदा टाळे तोडले. ढाँचा पाडताना आमचंच सरकार होतं. विश्व हिंदू परिषदेनं राम मंदीरासाठी हे आंदोलन खऱ्या अर्थानं सुरू केलं होतं परंतू आज विश्व हिंदू परिषद गायब आहे. भाजपचा तर अजेंडाच राम मंदीर आहे निवडणुकींपुरता का असेना पण आहे.
वरील सर्वांची मतं, वक्तव्य आणि कृती ह्या त्यांच्या त्यांच्या भविष्याच्या दृष्टीनं फार महत्वाच्या आहेत. याचं कारण म्हणजे २९ ऑक्टोबर पासून सुप्रिम कोर्ट राम जन्मभूमी आणि बाबरी ढाँचा प्रकरणावर रोज सुनवाई करणार आहे. त्या जागेवर राम मंदीर होतं हे जवळपास सिध्द होत आलंय. २०१० साली अलाहाबाद हायकोर्टाच्या लखनौ खंडीपीठानं दिलेल्या निकालाप्रमाणे रामाची मूर्ती जिथे आहे तिथेच राहील बाकी जमीन तीन समान भाग केले जातील ज्यामध्ये राम मंदीरासाठी एक, निर्मोही आखाड्यासाठी एक आणि सुन्नी वक्फ बोर्डासाठी एक असा निर्णय न्यायालयानं दिला नंतर ह्या निर्णयाला स्थिगिती देण्यात आली तो भाग वेगळा. याचाय अर्थ भारतातल्या बहुसंख्य समुदायाच्या भावना आणि एकूणच जागेची सद्यस्थिती पाहाता निकाल राम मंदीराच्या बाजूने लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. भारतातला बऱ्यापैकी मुसलमान देखील बाबराच्या एकूणच कृत्यांना समर्थन देण्यापासून नेहमीच लांब राहिलाय. त्यामुळे बाबरी मस्जिद स्वाभीमानाचा विषय वाटत नाही कारण बाबरी मस्जिद हे त्यांचं तिर्थक्षेत्र नव्हे. मक्का आणि मदीना हेच त्यांचं  एकमेव तिर्थक्षेत्र आहे आणि ते त्याची कुणाशीही बरोबरी करणार नाहीत. ते मस्जीद कुठेही बांधू शकततात हे त्यांना माहीतीय. परंतू जर मुस्लिमेतरांचा आयोध्या आणि राम मंदीर हा जर आस्थेचा विषय असेल तर ते आपण त्यांना खुशाल बांधू देण्याच्या भूमिकेत असल्याचं लक्षात येतंय, काही जणांना तर याच्याही काहीच घेणं देणं नाहीये ते बरे आणि त्यांचा मोहल्ला आणि त्यांच्या मोहल्यातील मस्जीद बरी.  काही मुसलमानांच्या  आडमुठेपणामुळे कित्येकांनी आत्तापर्यंत पोळ्या भाजल्या आणि ते मोठेही झाले परंतू हे देखील मुसलमानांच्य आता लक्षात आलंय. केवळ सुन्नी वक्फ बोर्डाला त्यातली काही जागा मिळण्याची आशा आहे म्हणून ते लढतायत एवढंच फक्त लक्षात ठेवावं.
        त्यामुळे वरती जी काही परिस्थिती वर्णीली आहे त्याप्रमाणे राम मंदीर बनेल परंतू त्याला बनवणार कोण? त्याचं उत्तर असं आहे की जर ही सुनवाई रोजच्या रोज घेतली जाईल. शक्यता आहे की काही महिन्यातच निकाल लागेल. आणि असेही उध्दव ठाकरे २५ नोव्हेंबरला अयोध्येला जाणार आहेत ते जाऊन आले की निकाल लागेल आणि मग रामदास कदमांसारखे सेनेचे नेते म्हणतील की उध्दवजी जाऊन आले म्हणून कोर्टाला राम मंदीराच्या बाजूने निकाल द्यावा लागला.नसता दिला तर ते अयोध्येच्या रस्त्यांवर उतरले असते वगैरे वगैरे. भाजपचं सरकार आहे म्हणून भाजप म्हणेल आमच्यामुळे झालं. व्हीएचपी सुरूवातीपासूनच या विषयात आहे त्यामुळे तेही म्हणतील आमच्या मुळेच झालं. उरलेली काँग्रेस आणि तत्सम पक्ष, संघटानाही श्रेय लाटण्यासाठी पुढे सरसावतील. त्यामुळे एक प्रश्न उरतो तो म्हणजे मंदीर तो वहीं बनायेंगे ठिकेय मगर मंदीर बनायेगा कौन?
        शेवटी एकच शक्यता राहून राहून वाटते ती म्हणजे या  सगळ्या गोंधळात मंदीराचं भूमीपूजन त्या बाबर वंशजाच्या हस्ते होतं की काय.


अहमद शेख
९९८७४७९२१३

Thursday, 20 September 2018

संघ,भारत आणि मुसलमान



हिंदुराष्ट्र है इसका मतलब यह नहीं होता की इसमें मुसलमान नहीं होंगे. जिस दिन ऐसा कहा जायेगा की यहां मुसलमान नहीं चाहिए उस दिन वह हिंदुत्व नहीं रहेगा, वो तो विश्वकुटूंब की बात करता है..
हे मत आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं. यावरून हे पुन्हा एकदा अधोरेखीत झालं की मुसलमानांना सोबत घेतल्याशिवाय या देशाची प्रगती म्हणावी तशी होणार नाही. मुसलमानच नव्हे या ठिकाणी अन्य कोणतीही जमात असती तरीही हेच विधान लागू होते. कारण एखाद्या समुदायाला डावलून कुठलीच व्यवस्था व्यवस्थित चालू शकत नाही. आणि तो समुदायही कुठलीही समांतर व्यवस्था चालवू शकत नाही जरी तसे प्रयत्न होत असतील तरीही,  हीच भारतीय लोकशाहीची खासियत आहे. आणि म्हणूनच संघाच्या या विधानाला इथं महत्व प्राप्त होतंय. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हे मत केवळ सरसंघचालकांचं नाही तर ते संपूर्ण संघ परिवाराचं आहे हे आवर्जून लक्षात घ्यावं. जे लोक संघाला संविधान न माननारं, कट्टर हिंदुत्ववादी संघटन, भटाळे, बामणी आणि अन्य प्रकारची स्वत:च्या संस्कृती आणि संस्कारांना अनुरूप विशेषणं लावतात त्या लोकांच्या थोबाडात ही एक चपराक आहे.
बरेच लोक माझ्यासोबत बोलताना सहज बोलून जातात की तू संघ विचारांना कसं काय मानतो ते तर हिंदुत्वाला मानतात. यात बरेच स्वयंसेवकही होते तो भाग निराळा. पण त्या प्रश्नाचं  उत्तर हे कालच्या संघाच्या या मतामध्ये आहे असं मी मानतो. प्रश्न संघ विचारांना मानण्याचा नसतो. त्याला समजण्याचा असतो. मानणारा हा स्वयंसेवक असतो मी स्वयंसेवक नाही पण चिकित्सक जरूर आहे. मी संघाच्या काही प्रमाणात का होईना पण अंतरंगात जाऊन संघ पाहिलाय. मी संघात असेही लोक पाहिले की ते मुसलमानांचा विरोध करतात परंतु हा टक्का अगदीच नगण्य आहे. त्यापेक्षा प्रेम आणि आपुलकीनं जवळ करणारा वर्ग संघामध्ये जास्त आहे. अशी बरीच उदाहरण आहेत ती पुढच्या वेळेस मांडता येतील...
काल भारिप पक्षाच्या एका प्रकाश आंबेडकर नावाच्या नेत्यानं असंबध्द बडबड करत काहीतरी आरोप लावले. दोन तीन वेळा ती पत्रकार परिषद मी नीट ऐकली परंतू त्याचा आणि या वक्तव्याचा कुठंही संबंध लागत नव्हता.  याच भारिपच्या माहितीसाठी संघाचं अजून एक स्टेटमेंट आहे ते म्हणजे- इस देश में केवल वेद नहीं चलेंगे तो बौध्दमत भी चलेगा, बौध्दमत के बीना हिंदुत्व-हिंदुत्व नहीं रहेगा. किसीके खान पान या रहन सहन पर संघ को कोई आपत्ती नहीं है।
हे संघाचं मत काही आत्ता परिवर्तीत वगैरे झालंय असं काही नाहीये. आपण ते कधीच ऐकलं नव्हतं, आपण कधीच संघाच्या अंतरात जाऊन अभ्यास करण्याचा प्रयत्न केला नाही, आपण कधीच बंच ऑफ थॉटसच्या पुढे जाऊन विचार केला नाही, आपण कधीच कुठल्या स्वयंसेवकाशी संवाद साधला नाही, आपण संघाच्या कुठल्याच प्रकल्पावर जाऊन अनुभव घेतला नाही, आपण कधीच एखाद्या प्रचारकासोबत मनमोकळ्या गप्पा मारल्या नाहीत...
इथे या देशात असेही विद्यार्थी नेते आहेत जे म्हणतात की संघ केवळ गरीबांना गरीब ठेऊ इच्छितो, संघ गरिबांना शिक्षण देण्याच्या विरोधात आहे, वनवासींचा विकास होऊ नये अशी संघाची इच्छा आहे त्यांनी खरंतर संघाचे देशभरात चालणाऱ्या १ लाख सत्तर हजारांपैकी केवळ एका जरी प्रकल्पाला, उपक्रमाला भेट दिली तर कळेल की संघाचा विचार किती व्यापक आहे. इथे लोक डायरेक्ट हिटलरशी तुलना करतात, त्यासाठी त्यांना प्रेस क्लबमध्ये एका टेबलाची आणि खुर्चीची व्यवस्था करून दिलेली असते केवळ हेच तुणतुणं वाजवायचं असेही निर्देश त्यांना असतात. अशा लोकांसाठी संघाचं दुसरं स्टेटमेंट आहे की,
आम्ही तुम्हाला कन्वीन्स करणार नाही कधी केलंही नाही आणि पुढेही करणार नाही. कन्वीन्स व्हायचं किंवा नाही हा तुमचा प्रश्न आहे. आम्ही फक्त संघ काय आहे ते मांडणार त्यामुळे कुणी निषेध केला काय आणि स्तुती केली काय त्याचा संघावर काही परिणाम होत नाही.
भारतातला मुसलमान अजूनही इथल्या मातीशी इमान राखून आहे. याच पुरातन संस्कृतीत तो जन्मला, इथेच वाढला, इथेच मरेल याच मातीत तो मिसळूनही जाईल. बेशक त्याची श्रध्दा आणि उपासना पध्दती वेगळी असेल तसा त्याला अधिकारही आहे. जे भरकटलेत त्यांना आमच्यासारखे मुसलमान देशहितासाठी सरळ मार्गावर आणतील. हे मात्र नक्की.


अहमद शेख
९९८७४७९२१३ 




Saturday, 8 September 2018

विद्यार्थी चळवळींना बदनाम करणारे बदमाश !!!


विद्यार्थी चळवळींना बदनाम करणारे बदमाश !!!

कालपासून एक व्हिडीओ व्हायरल होतोय.या व्हिडिओमध्ये कन्हैया कुमार नावाचा व्यक्ती ओसामा बिन लादेन या मारल्या गेलेल्या अत्यंत क्रूर वैश्विक दहशतवाद्याची स्तुती करतोय. ओसामा कसा बिचारा होता. त्याला कसं फसवलं गेलं आणि अमेरिकेनं स्वत:च स्वत:च्या देशातल्या इमारती पाडल्या आणि नाव ओसामाचं घेतलं. ओसामाला फसवलं गेलं. असा एकूणच त्या व्हिडीओमधील भाषणाचा सरळ सरळ सार आहे.  माझ्या माहितीप्रमाणे, मला जेवढी थोडी बहोत व्हिडीओच्या विषयातली समज आहे त्या प्रमाणे हा व्हिडीओ नक्कीच मॉर्फ केलेला नाहीये. ना ही त्याच्यासोबत काही छेडछाड केलेली आहे.
माझ्यासारख्या दशकभर विद्यार्थी चळवळीत काम केलेल्या किंवा अन्य जे अजूनही विद्यार्थी चळवळीत सक्रीय सहभागी आहेत अशा सर्व व्यक्तींनी कन्हैया कुमारसारख्या विषयावर लिहीण्याची किंवा चर्चा करण्याची खरंच गरज नव्हती परंतु ही गरज तेंव्हा वाढते जेंव्हा अशा व्यक्तींकडून विद्यार्थी चळवळी ह्या बदनाम होतात. लोकांचा गैरसमज होतो की विद्यार्थी चळवळी म्हणजे देशविरोधी घोषणा देणं, विद्यार्थी चळवळी म्हणजे नक्षलवादी कारवायांचं समर्थन करणं,  विद्यार्थी चळवळी म्हणजे ओसामाचं आणि अफजलचं समर्थन करणं, विद्यार्थी चळवळी म्हणजे वारंवार सगळ्या पक्षांच्या मंचावर जाणं त्यांचं लांगूलचालन करणं,देशाच्या सैनिकांच्या विरोधात बोलणं इ. इ होय...  विद्यार्थी चळवळींविषयीचा हाच गैरसमज दूर करणं आज विद्यार्थी क्षेत्रात काम केलेल्या किंवा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आवश्यक आहे. माध्यमांनी फुगवून ठेवलेला फुगा फोडण्याची गरज अशा वेळेस निर्माण होते.
कन्हैया कुमार नावाचा हा व्यक्ती नेहमी वर्ग संघर्षाच्या गोष्टी करतो. त्याला जगाला दाखवायचंय की भारत अजूनही मागासलेला आहे. कन्हैया नेहमची भांडवलशाही  विरोधात भाषणं करतो.त्याला दाखवायचंय की भारतात भांडवलशाहीनं किती अराजक माजवलंय. एकीकडे सैन्यावर आरोप करताना तो स्वताच्या घरातील सोळाजण सैन्यात आहेत हे सांगतो ( अर्थात या व्यक्तीनं त्या सोळा जणांची नाव दिली तर बरं होईल) आणि विरोधाभास निर्माण करतो. त्याच्या प्रत्येक भाषणातून भारतात गरिबांवर किती किती किती अन्याय होतात ते दाखवण्याचा प्रयत्न तो करतो. आंतरराष्ट्रीय राजकारणात भारताची अशा प्रकारे बदनामी करण्याचा प्रयत्न  माओ,मार्क्स,लेनिन,स्टालिन, अफजल गुरू आणि ओसामाचा हा भक्त का करतोय हे कुणी माध्यमं त्याला विचारतील का? हा प्रश्नय
विद्यार्थी चळवळी अशा नसतात बाबांनो, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी खपावं लागतं, दोन दोन दिवस उपाशी राहून विद्यार्थ्यांच्या घरोघरी प्रवास करावा लागतो. ऊन, वारा, पावसात कॉलेज कँम्पसवर  उभं राहून लढावं लागतं विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी. साध्या सायकल स्टँड, टॉयलेट ते सरकारच्या शैक्षणिक धोरणाच्या विषयात विद्यार्थी हक्कासाठी लढावं लागतं, प्रसंगी धोरणं ठरवण्यात महत्वाची भूमिका पार पाडावी लागते.तेंव्हा कुठे विद्यार्थी चळवळींतून नेत्वृत्व तावून सुलाखून तयार होतात. ओसामा आणि अफजलचा पुळका येऊन विद्यार्थी चळवळी केवळ बदनाम केल्या जाऊ शकतात. उद्या हाच व्यक्ती संविधान निर्माण करणाऱ्या बाबासाहेब आंबेकडरांवर देखील विधानं करू शकतो. जेएनयूमधल्या आंबेडकरी विद्यार्थी चळवळींनी तर याच्यापासून फारकत घेतलीच आहे. बाकीच्यांनीही लवकर शहाणं व्हावं आणि कन्हैयाच्या खांद्यावर बंदूक ठेवून नेम धरणाऱ्यांनीही आपला कम्युनिस्ट अजेंडा(जो काही असेल तो) न लपवता बिंदास्त लोकांसमोर मांडावा. तू बेगूसरायमधून लढलास काय किंवा लेनिनग्राड अथवा अफगाणिस्तानातून लढलास काय. आम्हाला तुझ्या राजकीय प्रगतीशी आणि प्रसिध्दीशी काही घेणंदेणं नाहीये. विद्यार्थी चळवळींच्या बदलत्या परिभाषेला देखील वैचारिक अधिष्ठानाशी बांधील राहाणं गरजेचं आहे अथवा  ती अशा प्रकारे भरकटेल तसंच सर्वसामान्य विद्यार्थी त्यापासून फारकत घेईल. असं न होता ह्या चळवळी जीवंत ठेवणं ही काळाची गरज माझ्यासारख्यांना वाटते.
असो, आत्ता पुन्हा व्हिडीओवर येऊयात. हा व्हिडीओ कधीचा आहे हे माहीती नाही पण त्यातला व्यक्ती मात्र तोच आहे आणि हे शंभर टक्के खरं आहे. कदाचित व्हिडीओ जुना आहे म्हणून आम्ही दाखवणार नाहीत अशी पळवाट माध्यमं काढतील. एक प्लेन क्रॅश झाल्यानंतर इतकी मोठी इमारत कशी काय कोसळू शकते? युट्यूबवरील डॉक्यूमेंटरी पाहिल्यानंतर त्याला हा प्रश्न पडला. तर त्याचं म्हणनं असं आहे  की त्या इमारती पाडण्यासाठी जबाबदार ओसामा नसून खुद्द अमेरिका आहे आणि बिचाऱ्या ओसामाला विनाकारण फसवलं जातंय...त्यामुळे त्याला जे प्रश्न पडलेत त्या प्रश्नांची उत्तरं भारतीय प्रसार माध्यमांनीच द्यावीत ही नम्र विनंती...

तळटीप- ज्या माध्यमकर्मींनी अशा प्रकारच्या तथाकथित विद्यार्थी/ युवा नेत्याला जन्म दिलाय त्यांनी आणि पिडीत, पिछडे कन्हैया समर्थकांनी कृपया उत्तर द्यावं. उत्तर न दिल्यास वॉलवर येऊन, मेसेंजरमधून उत्तर मिळेपर्यंत छळण्यात येईल.

© अहमद शेख
९९८७४७९२१३

Thursday, 7 June 2018

दुसऱ्या चळवळीची गरज



काल पासून घरी बसल्या बसल्या वृत्तवाहिन्यांवरून अनेक बातम्या पाहतोय त्यातली सर्वात महत्वाची बातमी म्हणजे काल देशभरातून पकडले गेलेले नक्षल समर्थक आणि माओवाद्यांच्या फ्रंटल ऑर्गनायझेशनचे कार्यकर्ते .चार वेगवेगळ्या ठिकाणांहून या पाच जणांना अटक केलीय. त्यामध्ये मुंबईतला दलित पँथरचा संस्थापक सदस्य सुधीर ढवळे हा म्होरक्या. हे पाच जण किती महान आहेत किंवा त्यांचा इतिहास काय हे पुन्हा पुन्हा सांगण्याची गरज नाही, सगळ्या माध्यमांनी त्यांना कोळून पिण्याचं काम केलंय. आपला मुद्दा थोडासा वेगळा आहे . तसं पाहायला गेलं तर सर्वसामान्य लोकांना हे कळणं थोडं अवघड आहे की हे लोक नेमके कोण आहेत, पण त्यांना एल्गार परिषद ठाऊक आहे आणि माध्यमांच्याद्वारे त्यांना एवढंच कळतंय की हे लोक म्हणजे एल्गार परिषदेचे आयोजक होते. एल्गार परिषदेत भाषणं झाली, भले ती थोडीशी असतील प्रक्षोभक. गाणी झाली, सांस्कृतिक कार्यक्रम झाले मग हे चूक कसं काय? असाच प्रश्न शीतल साठे आणि सचिन माळीबद्दल लोकांना नेहमीच पडायचा. आणि माध्यमांनी सुध्दा सचिन आणि शीतल यांना कलाकारांच्या चष्म्यातून पाहिलं आणि डोक्यावर घेतलं, परिणामी त्यांना विरोध करणारी, त्यांचे नक्षलवादाशी संपर्क असणाऱ्या गोष्टी उजेडात आणणारी समाजातील काही मंडळी, संघटना, संस्था ह्या जनमानसात बदनाम झाल्या. कलाकारांना केवळ कलाकारांच्याच नजरेनं पाहा अशी बीजे पेरणारी मंडळी दुर्दैवानं माध्यम क्षेत्रात ठासून भरलेली आहेत.  उद्या कदाचित सुधीर ढवळे आणि मंडळींबद्दल त्यांच्या त्यागाचे, घरच्या परिस्थितीचे, त्यांच्या समाजभानाचे रिपोर्टस समोर येतील, एल्गार परिषदेमधली भाषणं आणि सादरीकरण म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचाच एक भाग होता, ज्याला कुणीही हिरावून घेऊ शकत नाही अशा वावड्या उठतील आणि सबळ पुराव्याआभावी हे लोक पुन्हा देशद्रोही कारवायांमध्ये सक्रीय होतील. आणि ज्यांनी त्यांच्याविरूध्द बोलण्याचं संशोधन करण्याचं धाडस दाखवलं अशी पुण्यातली आणि मुंबईतली मंडळी आणि संस्था ह्या पुन्हा बदनाम होतील.
कला क्षेत्राला हाताशी धरून सहानुभूती घेत ही मंडळी नेहमची आपल्या कारवाया सक्रीयपणे राबवत असतात. यांना सहानुभूती मिळते ती समाजातील तथाकथित प्रेक्षकांची,  गावखेड्यातल्या अशिक्षित गोरगरीब जनतेची आणि त्यात भरीस भर म्हणजे इलेक्ट्रॉनिक माध्यमे हे नेहमी या लोकांना निर्दोष सिध्द करण्यासाठी करत असलेले प्रयत्न.
माझा लिहीण्याचा मुख्य कल आहे तो म्हणजे कला क्षेत्रातून अर्बन नक्सलीजम महाराष्ट्रात पसरवण्याच्या पध्दतींची रोकथाम कशाप्रकारे करता येईल यावर उहापोह करण्याचा.
लोककला, लोकगीते, पथनाट्य, मंचीय नाटके ते थेट सिनेमापर्यंत ही मंडळी समाजात नक्षलवादाच्या समर्थनाचं स्लो पॉईझीनींग करत असतात. पूर्वी त्याचा सरळ सरळ प्रभाव जाणवत नसायचा परंतु शीतल आणि सचिनसारखे तरूण त्यांच्या जाळ्यात ओढले जायचे आणि मग ते चळवळीसाठी सर्व आयुष्य वाहून घेण्याच्या आणाभाका घ्यायचे. परंतु एल्गार परिषदेनं मात्र सरळ सरळ त्यांचे मनसुबे दाखवून दिले आहेत. याचा अर्थ आपण असा  घ्यायचा का? की नक्षलवादाची ताकद आता केवळ छुप्या पध्दतीची राहीली नसून ती इतकी वाढलीय की सरळ सरळ गृहयुध्द करण्याची देखील त्यांची तयारी असावी. हे विधान जेवढं धाडसी आहे तेवढंच सत्य असण्याची शक्यता ही सद्य परिस्थितीवरून जाणवते यात शंका नाही.
अर्बन नक्सलीजमची ताकद वाढणे ही संपूर्ण देशासाठी धोक्याची घंटा आहे हे वारंवार सांगणारी आणि संशोधन करणारी मंडळीही समाजात आहे आणि कदाचित त्यांच्या या संशोधनामुळेच गुप्तचर विभागाला बरीच मदतही होत असेल.
आता राहिला मुद्दा उत्तर द्यायचा , त्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांना, गाण्यांना, नाटकांना तोडफोडीनं नव्हे तर त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याची गरज आहे. समाजात तळागाळात जाऊन हा देश किती महान आहे आणि हजारो वर्षांपासून इथल्या मातीनं जे आमच्यावर उपकार केलेत ते कोणत्याही मार्क्सचं अनुकरण करून, किंवा माओ, शे यांसारख्या विखारी क्रांती करून फिटणारे नाहीत तर बुध्दाचा साम्यवाद आणि बुध्दच या राष्ट्रासाठी कसा श्रेष्ठ आहे, हे ज्यावेळेस समजेल आणि त्याच्या अनुकरणातून जेंव्हा हा देश खऱ्या समरसतेकडे, बाबासाहेबांना अपेक्षित असलेल्या समतेच्या दिशेने वाटचाल करेल तेंव्हा या मातीचे उपकार फिटतील. कलेसारख्या प्रभावी माध्यमातून जनजागृती महत्वाची आहे कारण जोपर्यंत या लोकांना जनतेची सहानुभूती आहे तोपर्यंत कुठलेही सरकार यांना हद्दपार करू शकणार नाही.जंगलात या लोकांनी सर्वसामान्य आदिवासींच्या घरांची ढाल केली आणि हे लोक सुरक्षितपणे कारवाया करत राहिले . हेच अर्बन नक्षलवादी आज कलेच्या माध्यमातून शहरांतील लोकांच्या मेंदूचा आणि मनाचा ढाल म्हणून वापर करतायत. म्हणून आता या लढाईमध्ये, आपल्या शस्त्रांमध्ये देखील बदल केला पाहिजे.
 एक चळवळ उभी राहतेय विचारवंतांची आता दुसऱ्या चळवळीची गरज आहे आणि ती चळवळ म्हणजे कलाकारांची.

Thursday, 15 March 2018

मेरे इश्क की चाय...

यादों की आग से तपी हुई है, ये मेरे इश्क की चाय
जाम ए नशेसी तलप है, ये मेरे इश्क की चाय
फूंक फूंककर पीना,
बरसों से उबल रही है
पत्ती पुरानी हैे,
जितना निचोडोगे उतनी रंग लायेगी,
ये मेरे इश्क की चाय

बहोत दूर से, पहाडों से, नदीयों की धाराओंसे
मजदूरों के कोमल हातों से
किसी पीठ के बोझ से,
गुजरते हुए बडे तकलीफ से
बस तेरे लबों को छूने आई है,
ये मेरे इश्क की चाय...

तारों को तनहाई में, तेरा साथ
हजारों की भीड में ,तेरा हाथ
ठंड में कपकपाते होठों को
रिश्तों में दोस्तो में, रूठों को
हर लब ओ लब्ज को मनाने आई है, ये मेरे इश्क की चाय


शिशे की प्याली में
बस कुछ बूँदों में बची है,
सूखी प्याली में कुछ दाने डाल दे,
फिर से रंग लायेगी
 ये मेरे इश्क की चाय

Monday, 26 February 2018

पानगळीच्या हंगामात

पानगळीच्या हंगामात अनंत पाने गळली
मोहर यावा पुन्हा फु टावी, आस तयांना हळवी

कर्दमलेले एक सानुले आईस बिलगुन होते
वादळआले तोडून गेले फांदीसवेचे नाते
विरहाने त्या तान्हुल्याच्या सुकून फांदी गेली

व्यक्त व्हाव्या तुझ्या भावना छुप्या साश्रू नयनांनी
कवेत घेऊनी मज जाशी , जिवलगा दु:ख विरूनी
दोनास दोन हात मिळता बघ, बाग कशी मोहरली

पहाडासम उभे राहावे, तुफान अंगी भरुनी
येती जाती मोसम सारे,हर पानांची तीच कहानी
अंधारातून पुढे चाल बघ किरणांची लाली पसरली

वटवृक्षा कोसळता ऐकावी, आर्त किलबील कुणी
तग धरल्या मुळावरती हिरवे, बघ येती कोंब फुटूनी
मुक्त गगणी उभे राहता,पुन्हा पाखरे किलबिलली

नाजूक साजूक कळ्या पाकळ्या फुलले गुलमोहर ते
अंगावरती उन्हे घेऊनी, काया परी ती फुलली
लाल खळीच्या गालावरती लाज कशी मोहरली



                                                             
                                                                  - सा ग़ र

                                                                  (अहमद)