Saturday, 20 December 2014

अभी तो मासूम था…

अभी तो मासूम था… 
लंबी नाक, घुंगराले बाल 
आँखों में चमक , चेहरे पे नूर था। … अभी तो वो मासूम था.. 

कोवळया जीवाची आणखी काय व्याख्या करावी, आणि अशा कोवळ्या जीवाला त्याच्या डोक्यात, डोळ्यात ,छातीमध्ये जर संगिनी घुसवून गोळ्या घालून क्रूरपणे कोणताही अपराध नसताना मारले जावे तर अशा हैवानियत ची काय व्याख्या करावी… प्रथम मी त्या कोवळ्या जीवांना श्रद्धांजली अर्पू इच्छितो.
     काय लिहावे हा प्रश्न हि घटना घडल्या पासून मला पडला होता, नक्की कशावर लिहू ? त्या लहान मुलांच्या अवस्थेवर लिहू कि पाकिस्तानी प्रशासन व्यवस्थेवर काही लिहू किंबहुना पाकिस्ताननेच सर्परूपी पाळलेल्या अशा दहशतवादी संघटने आणि संस्थेवर लिहू, का मग त्याच्या पलीकडे जाऊन आणखी काहीतरी … 
      पाकिस्तान असो किंवा असे कोणतेही इस्लामिक राष्ट्र तिथे घडलेल्या घटनांचा थेट परीणाम आज जगावर किंवा जागतिक राजकारणावर होताना दिसतो. मग या जागतिकीकरणातून भारतही हि कधी सुटलेला नाही किंबहुना भारत अशा घडामोडी मध्ये निर्णायक भूमिकाहि सांगू शकतो जे कि इतिहासामध्ये सर्वश्रुत आहे .              भारतामध्ये मुस्लिम असुरक्षित आहेत असा नेहमी कांगावा करणारे परवेज मुशर्रफ सारखे संधी साधू पाकिस्तानी तसेच भारतीय समाजवादी काय विचार करतायत हे देखील पुढे येणं गरजेचं आहे,  फाशीच्या शिक्षेची बंदी उठवून पाकिस्तानने दहशतवादी कैद्यांना फासावर चढवायला सुरुवात केलीय मग, कसाब चा पुळका येणाऱ्या आमुक आमुक लेखिका, पत्रकार याचं काय मत आहे ते हि समोर आलं पाहिजे किंवा अशा हरामखोरांना न्यायसंस्थेने उत्तर द्यायला भाग पाडले पाहिजे. 
मुळात भारतीय मुस्लिम प्रतिनिधींचे मत काय,  (मी एम. आय.  एम सारख्या पक्षाला किंवा त्यांच्या नेत्यांना भारतीय मुस्लिमाचे प्रतिनिधी मानत नाही )  भारतीय मुस्लिम याबद्दल काय विचार करतोय अशी क्रूरता कितपत मान्य आहे, जेंव्हा अरब मध्ये इस्लामच्या पूर्व लहान लहान मुलींना जिवंत दफन केले जायचे अशा प्रथेला खीळ लावण्याचं काम मुहम्मद पैगंबरांनी(स. अ. व. ) आणि  इतर प्रेषितांनी केलं, त्या पार्श्व भूमीवर अशी घटना कितपत पाकिस्तानी जनतेला मानवते हा पण एक विचार आहे कारण आज ह्या घटनेचा निषेध करणार्यांची संख्या जरी जास्त असली तरी अशा कृत्याचं समर्थन करणारी जनता पाकिस्तानमध्ये आहे. तालिबान ला समर्थन म्हणजेच अशा कृत्यांना देखील समर्थन हे उघड उघड स्पष्ट आहे . पाकिस्तानची तालिबान विरोधी मोहीम, मलाला ला मिळालेलं नोबल, पाकिस्तानने अंगीकारलेली आधुनिक शिक्षण पद्धती 
या सर्वांचं फळ म्हणजे ह्या लहान मुलांचा गेलेला जीव होय. मग याला आपण इस्लाम च्या मुळ विचारसरणीशी जोडू नये, आणि कोणी जोडलच तर माझ्यासारख्याला त्याचा रागही येता कामा नये कारण अशावेळी माझ्यासारखा माणूस हतबल होऊन जातो, काहीच करू शकत नाही. अशी कृत्ये करून इस्लाम ला बदनाम करणार्या मुस्लिमांची संख्या दुर्दैवाने आज जास्त आहे, जे कि मूळ विचारसरणीवर किंवा तत्वांवर आधारलेली नाही, मग बर्या वाईट चार ओळी ऐकलेल्या किंवा वाचलेल्या पंडितांना इस्लाम कसा श्रेष्ठ हे सांगण्यात माझ्यासारख्याच्या नाकी नव येणं साहजिकच. 
     असाही तर्क लावला जाऊ शकतो  जे कि अतिशय चागली सवय आहे, तर तर्क असा होता कि तालिबान चा समूळ नायनाट करण्यासाठी पाकिस्तानला द्रोण नावाच्या मनुष्य विरहीत म्हणजेच स्वयंचलित विमानांची गरज आहे मग तालिबान किती खालच्या थराला जाऊन कृत्य करू शकतो हे अमेरिकेला दाखवून द्रोण विमाने पदरात पाडून घ्यायची आणि नंतर तालिबान्यांशी लढायचं, मग त्यासाठी आपल्याच सैन्याचा वंश संपवायचा, आता या तर्कामध्ये ज्या गोष्टी समोर आल्या त्यामुळे या तर्कावरती विश्वासही बसू शकतो. आता हा मानवी स्वभाव आहे कि त्यांना आमुक आमुक गोष्ट मिळविण्यासाठी असे कृत्य केले त्याला एखाद्या धर्माच्या तत्वांशी कसं काय जोडू शकतो, मग त्या मित्राने अशा घटनेवरती जो तर्क लावला ती तर्क बुद्धी त्याच्या धर्माने त्याला दिलेल्या शिकवणीचा भाग आहे असं होउच शकत नाही कारण त्याचा धर्म मानवतेचा आहे सकारात्मक विचार जगाला देणारा आहे, म्हणजे हा त्याच्या स्वभावाचा भाग आहे शेवटी जे काही तत्वज्ञान निर्मिले गेले ते सर्व मानवनिर्मितच आहे ( हे पण सत्य आहे कि या निर्मिती मागे ईश्वराचा वरदहस्त नक्कीच आहे .)
      म्हणूनच मानव नेहमीच धर्माच्या वर जावून विचार करीत आलेला आहे, आणि अशा घटनांना धर्माच्या नावाखाली खपवत आलेला आहे, कुठलाच धर्म इतक्या खालच्या थराची शिकवण कधीच देणार नाही , धर्माचा विपर्यास करणारांची संख्या पण त्या त्या धर्मात असतेच. 
सांगण्याचा मतितार्थ एवढाच कि प्रत्येक घटनेला धर्माशी किती जोडाव हे  सद्सदविवेकबुद्धीने विचार करणार्या ज्यांच्यावर एकूणच सर्व समाजाची दिशा अवलंबलेली आहे, अशा महानुभवांनी याचा साकल्याने एका विशिष्ट चौकटीत न राहता विचार केला पाहिजे… 

अहमद शेख
९६९९९३६५७५ 

Tuesday, 2 December 2014

कितपत पटतंय ?

काल पासून विविध वृत्तवाहिन्यांवर सुरु असलेल्या आणि आज  सकाळच्या वृत्तपत्रामध्ये वाचलेल्या बातमीने मन हेलावून  तर गेलेच पण तळपायाची आग देखील  थेट मस्तकी जाऊन भिडली, बातमी होती छत्तीसगढ मध्ये  सुकमा जिल्ह्यातील चिन्तनगुफ़ा येथे नक्षलवाद्यांनी १४ जवानांना ठार केले, अशा बातम्या आपल्या मुंबई - पुण्यामध्ये राहणाऱ्या लोकांसाठी कितपत महत्वाच्या आहेत किंवा ते अशा गोष्टींना कितपत गांभीर्याने घेतल्या जातात माहित  नाही, हा वेगळ्या संशोधनाचा विषय आहे.
     परंतु या बातम्या महत्वाच्या आहेत माझ्या गावाकडे राहणाऱ्या दोन एकर शेतीमध्ये गुजराण करणाऱ्या गरीब शेतकऱ्यासाठी , किंवा त्या वृद्ध शेतमजुरासाठी ज्यांचा एक मुलगा पोलिस सेवेमध्ये आहे, केंद्रीय राखीव पोलिस दलात आहे, किंवा  सीमेवर जो देशाचे रक्षण करतोय. आपला एक मुलगा कुठेतरी अशा नोकरीमध्ये आहे जिथे मृत्यू कधी येईल ते सांगता येत नाही.  तरीही हा बळीराजा देशाला आपल्या अन्नधान्याने पोसत असतानाचा देशाच्या संरक्षणासाठी आपल्या पोटच्या गोळ्यांना पण तो न्योछावर करतोय, त्याला माहित नाही नक्षलवादी कोण आहेत ? त्याला हे पण माहित नाही कि त्यांच्या विविध चालणाऱ्या चळवळी कोणत्या आहेत ? त्याला फक्त हे ठाऊक आहे कि नक्षलवादी नावाचे कुणीतरी देशविघातक कृत्य करणारे देशद्रोही या भारतात आहेत आणि आपला मुलगा त्यांच्याशी लढायला गेलाय किंवा तो त्यांच्याशी लढताना विरगतीस  प्राप्त झालाय, तो शहीद झालाय.
     आता मुद्दा असा आहे कि सरकारची मदत तर त्यांना मिळेलच पण साऱ्या समाजाचा ठेका उचलू पाहणाऱ्या स्वतःला समाजसेवी, सेवाभावी समजणाऱ्या संघटना आणि त्यांचे बुद्धिवादी शिरोमणी कुठे जातात अशावेळी  का ते या शेतकऱ्यांना किंवा या जवानांच्या नातेवाईकांना  भेटत नाहीत, का ते नक्षलवाद आणि त्यांच्या कारवायांवरती बोलत नाहीत ? " नक्षलवादी ठरवणारे तुम्ही कोण? " असा खडा सवाल विचारणारे पत्रकार का या संघटनांना त्यांच्या गप्प बशा भूमिकेबद्दल विचारत  नाहीत ? आझाद नावाचा नक्षलवादी जेंव्हा मारला गेला तेंव्हा लगबगीने हैद्राबादला गेलेल्या अरुंधती राय का त्या शहिदांच्या घरी भेट देत नाहीत? कुठे गेले कायदे पंडित ?कुठे गेले लोकायत वाले ? कबीर कला मंच का आता या विषयावर मैफिली बसवत नाहीत. या संघटनांना बळ देणारे आमक्या - तमक्याचे कैवारी गेले कुठे? अनेको  नावे आहेत , ती इथे उल्लेखली तर अनेकांच्या नाकाला मिरच्या झोंबतील. आणि म्हणतील हा विषय आमचा नाही मग भविष्यात यांनी परत नक्षलवादाचा कळवळा घ्यावा आणि कोणीतरी यांच्या मुस्काडात मारावी असे होऊ नये म्हणजे झालं .
     आम्ही शहरात राहणारे लोक नक्षलवादापासून शेकोडो मैल दूर आहोत हे खरं आहे पण त्यांच्या समर्थित संघटना(frontal organizations)आपल्या  दाराशी येउन उभ्या आहेत हे समजलं पाहिजे,नाही तर  सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यांमध्ये नक्षलवाद फोफावायला काहीच वेळ लागणार नाही आणि  आज जी परिस्थिती माझा वनवासी बंधू भोगतोय ती परिस्थिती आपल्यावरही यायला काहीच वेळ लागणार नाही. या समर्थित संघटनांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन नक्षलवादी शहरात पण घुसण्याचा प्रयत्न करताहेत. हा मुद्दा दुसऱ्यांदा मी उपस्थित करतोय कारण जितक्या वेळेस अशा घटना नक्षली भागात घडत असतात अशा वेळी या संघटनांचे छुपे समर्थन हे त्यांना असते, हे अनेक वेळा सिद्ध झालेलं आहे, आणि इथून पुढे ते आपल्या निदर्शनासही  येत राहील. त्यामुळे अशा संघटनांना विरोध म्हणजे चार ओळी लिहून किंवा कुठेतरी दोन चार शिव्या घालून मोकळे होणारे आम्ही नाही . अशा संघटनाचा आम्ही रस्त्यावर उतरून वेळप्रसंगी त्याचा विरोध केला आहे आणि पुढेही करत राहू .
    सरकार याबद्दल काय विचार करतंय माहित नाही पण अभाविप या विषयाला नेहमीच संवेदनशील पणे घेते.  मग सरकार पण या हात घालायला तयार नसेल तर आम्ही सरकारला तसं करायला भाग पाडू , हे बुद्धीचे ठेकेदार जरी गप्प बसले तरी आम्ही त्या वनवासी बंधूंना, त्या शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना नक्कीच  सहकार्य करू, सहानुभूती दाखवू .
     थेट व्यवस्थेच्या विरोधात शस्त्र घेऊन उभे रहायचे, मूळ चळवळी शी काहीही देणघेण न ठेवता भलेपणाचे सोंग दाखवून गळे चिरायचे आणि त्यांच्या या पापी धंद्यांना या बुद्धीवाद्यांनी समर्थन द्यायचं, आणि आपण हे सगळं मुग गिळून गप्प बसत हा तमाशा बघत बसायचा कितपत पटतंय लोकहो तुम्हाला ???

अहमद  शेख - ९६९९९३६५७५