Thursday, 14 February 2019

सोयीस्कर विचारवंत...


सोयीस्कर विचारवंत...
काल अवंतीपुरामध्ये झालेल्या हल्यात जवळपास चाळीस जवान शहीद झाले. त्या सर्व जवानांना सर्वप्रथम भावपूर्ण श्रध्दांजली...
आणि श्रध्दांजली  त्या विचारवंतांच्या वैचारिकतेला जे केवळ स्वत:च्या स्वार्थासाठी, स्वपुरस्कृत चळवळींसाठी आणि तथाकथित मानवी हक्कांसाठी गळे काढत असतात. श्रध्दांजली त्या माझ्या सर्व माध्यमातील मित्रांच्या विचारांना ज्यांनी आपली लेखणी केवळ एका अजेंड्यासाठी वाहिलीय, जे केवळ बोलतील- तर जेएनयूमध्ये होणाऱ्या तथाकथित अत्याचारावर, जे केवळ लिहीतील तर-माओवादी पुरस्कृत विचारवंतांवर होणाऱ्या तथाकथित अन्यायावर. ज्यांनी आपली बौध्दीक क्षमता केवळ तुकडे गँगला दोषमुक्ततेचं सर्टिफिकेट देण्यात वाहिली. त्या तमाम बगलबच्च्यांच्या जोशाला श्रध्दांजली ज्यांनी आमच्या साहेबांच्या चित्रात, विचारांत,भाषणांत आणि राजकारणात किती वैचारिक खोली आहे , हे वर्णिण्यात आपल्या वाफा उडवल्या. श्रध्दांजली त्या बगलबच्चांच्या डोक्यात न पडलेल्या ‘प्रकाशा’ला,  जो केवळ आपल्या समाजवर होणाऱ्या तथाकथित अत्याचाराला प्रकाशमान करण्याचा प्रयत्न करतायत.... आणि हो श्रध्दांजली त्या ढोंगी सांत्वनाला जे निघतं आमच्या गलिच्छ राजकारण्यांच्या डोक्यातून...
ही श्रध्दांजली वाहण्याचं कारण म्हणजे वरीलपैकी एकाही संबंधिताने काल झालेल्या घटनेवर आपलं मत व्यक्त केलं नाही. खरंतर हे पाहून मला आश्चर्य वाटलं. नेहमी कोणत्याही विषयावर सरकारला धारेवर धरणारे तथाकथित पुरोगामी विचारवंत आज कसे काय व्यक्त झाले नाहीत. जे व्यक्त झाले त्यांनी राजकारण करण्याची संधी सोडली नाही. कदाचित हा लेख समाजमाध्यमांवर प्रसारित होईपर्यंत काही लोक व्यक्तही होतील ते ही केवळ एक औपचारिकता म्हणून. माध्यम क्षेत्रात आणि सामाजिक क्षेत्रातही माझे बरेच मित्र आहेत जे नेमही सरकारवर, विशेष करून सरकारला समर्थन देणाऱ्या जनतेला ‘भक्त’ म्हणून संबोधण्यात कुठेच कमी पडत नाहीत. खरं तर या मित्रांना मी ईथे टॅगही करू शकतो जे काही घडण्याच्या आत व्यक्त होतात ते अजूनही व्यक्त झालेले नाहीत. समजा कुण्या राजकीय नेत्याचा एखादा लेख, मुलाखत किंवा चित्र प्रसारित झालं तर लगेच हे व्यक्त होतील. माओवादाशी संबंध असणाऱ्या संशयीतांवर कारवाई केल्यास  लगेच हे लोक व्यक्त होतील. पण देशाचे चाळीसपेक्षा जास्त जवान शहीद झाल्यानंतरही  यांना असं वाटत नाही की आपण त्यावर व्यक्त व्हावं, काही बोलावं. काही लोकांनी तर मानसिकदृष्ट्या काश्मीरला पाकिस्तानास देऊन टाकलंय त्यामुळे त्यांनी काही बोलावं अशी अपेक्षाही नाही.
प्रस्थापित विचावंत तर केवळ देशांतर्गत होणाऱ्या घटनांवर नकारात्मक पध्दतीने व्यक्त होण्यासाठीच पैदा झालेत की काय अशीही शंका येते.  खरंतर जे लोक सीमेवरील भारतीय सैन्यांवर आरोप करायला मागे पुढे पाहात नाहीत,आणि ह्यांच्या  समर्थनार्थ ह्यांचे बगलबच्चे रस्त्यावर उतरायला उतावीळ असतात. अशा लोकांकडून काय अपेक्षा ठेवणार...
राहाता राहीला विषय बदल्याचा...अवंतीपुऱ्याचा बदला तर नक्कीच घेतला जाईल, घरात घुसून मारलं जाईल.भारतीय सैन्याकडून नक्कीच ईंट का जवाब पथ्थर से दिला जाईल. आणि जेव्हा भारत बदला घेईल तेंव्हा मात्र हे लोक नक्की बोलतील. –
 ‘ हे तर आम्ही आमच्या काळातही केलं होतं’, ‘हा तर काश्मीरी जनतेवर अन्याय आहे’,  ‘बघा भारतीय सैन्य किती अत्याचारी आहेत’
त्यामुळे या  सोयीस्कर विचारवंतांच्या बौध्दीक दिवाळखोरीची आणि उष्ट्या खरकट्या  विचारांची या देशाला आता  गरजही उरलेली नाहीये...अशा विचारवंतांना आजपासून तिलांजली..
आणि आता केवळ एकच नारा..
आतंकवादीयों को रोक देंगे, वरना उको ठोक देंगे
जो सारे का सारा है, वो कश्मीर हमारा है

अहमद शेख
९९८७४७९२१३