Saturday, 8 September 2018

विद्यार्थी चळवळींना बदनाम करणारे बदमाश !!!


विद्यार्थी चळवळींना बदनाम करणारे बदमाश !!!

कालपासून एक व्हिडीओ व्हायरल होतोय.या व्हिडिओमध्ये कन्हैया कुमार नावाचा व्यक्ती ओसामा बिन लादेन या मारल्या गेलेल्या अत्यंत क्रूर वैश्विक दहशतवाद्याची स्तुती करतोय. ओसामा कसा बिचारा होता. त्याला कसं फसवलं गेलं आणि अमेरिकेनं स्वत:च स्वत:च्या देशातल्या इमारती पाडल्या आणि नाव ओसामाचं घेतलं. ओसामाला फसवलं गेलं. असा एकूणच त्या व्हिडीओमधील भाषणाचा सरळ सरळ सार आहे.  माझ्या माहितीप्रमाणे, मला जेवढी थोडी बहोत व्हिडीओच्या विषयातली समज आहे त्या प्रमाणे हा व्हिडीओ नक्कीच मॉर्फ केलेला नाहीये. ना ही त्याच्यासोबत काही छेडछाड केलेली आहे.
माझ्यासारख्या दशकभर विद्यार्थी चळवळीत काम केलेल्या किंवा अन्य जे अजूनही विद्यार्थी चळवळीत सक्रीय सहभागी आहेत अशा सर्व व्यक्तींनी कन्हैया कुमारसारख्या विषयावर लिहीण्याची किंवा चर्चा करण्याची खरंच गरज नव्हती परंतु ही गरज तेंव्हा वाढते जेंव्हा अशा व्यक्तींकडून विद्यार्थी चळवळी ह्या बदनाम होतात. लोकांचा गैरसमज होतो की विद्यार्थी चळवळी म्हणजे देशविरोधी घोषणा देणं, विद्यार्थी चळवळी म्हणजे नक्षलवादी कारवायांचं समर्थन करणं,  विद्यार्थी चळवळी म्हणजे ओसामाचं आणि अफजलचं समर्थन करणं, विद्यार्थी चळवळी म्हणजे वारंवार सगळ्या पक्षांच्या मंचावर जाणं त्यांचं लांगूलचालन करणं,देशाच्या सैनिकांच्या विरोधात बोलणं इ. इ होय...  विद्यार्थी चळवळींविषयीचा हाच गैरसमज दूर करणं आज विद्यार्थी क्षेत्रात काम केलेल्या किंवा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आवश्यक आहे. माध्यमांनी फुगवून ठेवलेला फुगा फोडण्याची गरज अशा वेळेस निर्माण होते.
कन्हैया कुमार नावाचा हा व्यक्ती नेहमी वर्ग संघर्षाच्या गोष्टी करतो. त्याला जगाला दाखवायचंय की भारत अजूनही मागासलेला आहे. कन्हैया नेहमची भांडवलशाही  विरोधात भाषणं करतो.त्याला दाखवायचंय की भारतात भांडवलशाहीनं किती अराजक माजवलंय. एकीकडे सैन्यावर आरोप करताना तो स्वताच्या घरातील सोळाजण सैन्यात आहेत हे सांगतो ( अर्थात या व्यक्तीनं त्या सोळा जणांची नाव दिली तर बरं होईल) आणि विरोधाभास निर्माण करतो. त्याच्या प्रत्येक भाषणातून भारतात गरिबांवर किती किती किती अन्याय होतात ते दाखवण्याचा प्रयत्न तो करतो. आंतरराष्ट्रीय राजकारणात भारताची अशा प्रकारे बदनामी करण्याचा प्रयत्न  माओ,मार्क्स,लेनिन,स्टालिन, अफजल गुरू आणि ओसामाचा हा भक्त का करतोय हे कुणी माध्यमं त्याला विचारतील का? हा प्रश्नय
विद्यार्थी चळवळी अशा नसतात बाबांनो, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी खपावं लागतं, दोन दोन दिवस उपाशी राहून विद्यार्थ्यांच्या घरोघरी प्रवास करावा लागतो. ऊन, वारा, पावसात कॉलेज कँम्पसवर  उभं राहून लढावं लागतं विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी. साध्या सायकल स्टँड, टॉयलेट ते सरकारच्या शैक्षणिक धोरणाच्या विषयात विद्यार्थी हक्कासाठी लढावं लागतं, प्रसंगी धोरणं ठरवण्यात महत्वाची भूमिका पार पाडावी लागते.तेंव्हा कुठे विद्यार्थी चळवळींतून नेत्वृत्व तावून सुलाखून तयार होतात. ओसामा आणि अफजलचा पुळका येऊन विद्यार्थी चळवळी केवळ बदनाम केल्या जाऊ शकतात. उद्या हाच व्यक्ती संविधान निर्माण करणाऱ्या बाबासाहेब आंबेकडरांवर देखील विधानं करू शकतो. जेएनयूमधल्या आंबेडकरी विद्यार्थी चळवळींनी तर याच्यापासून फारकत घेतलीच आहे. बाकीच्यांनीही लवकर शहाणं व्हावं आणि कन्हैयाच्या खांद्यावर बंदूक ठेवून नेम धरणाऱ्यांनीही आपला कम्युनिस्ट अजेंडा(जो काही असेल तो) न लपवता बिंदास्त लोकांसमोर मांडावा. तू बेगूसरायमधून लढलास काय किंवा लेनिनग्राड अथवा अफगाणिस्तानातून लढलास काय. आम्हाला तुझ्या राजकीय प्रगतीशी आणि प्रसिध्दीशी काही घेणंदेणं नाहीये. विद्यार्थी चळवळींच्या बदलत्या परिभाषेला देखील वैचारिक अधिष्ठानाशी बांधील राहाणं गरजेचं आहे अथवा  ती अशा प्रकारे भरकटेल तसंच सर्वसामान्य विद्यार्थी त्यापासून फारकत घेईल. असं न होता ह्या चळवळी जीवंत ठेवणं ही काळाची गरज माझ्यासारख्यांना वाटते.
असो, आत्ता पुन्हा व्हिडीओवर येऊयात. हा व्हिडीओ कधीचा आहे हे माहीती नाही पण त्यातला व्यक्ती मात्र तोच आहे आणि हे शंभर टक्के खरं आहे. कदाचित व्हिडीओ जुना आहे म्हणून आम्ही दाखवणार नाहीत अशी पळवाट माध्यमं काढतील. एक प्लेन क्रॅश झाल्यानंतर इतकी मोठी इमारत कशी काय कोसळू शकते? युट्यूबवरील डॉक्यूमेंटरी पाहिल्यानंतर त्याला हा प्रश्न पडला. तर त्याचं म्हणनं असं आहे  की त्या इमारती पाडण्यासाठी जबाबदार ओसामा नसून खुद्द अमेरिका आहे आणि बिचाऱ्या ओसामाला विनाकारण फसवलं जातंय...त्यामुळे त्याला जे प्रश्न पडलेत त्या प्रश्नांची उत्तरं भारतीय प्रसार माध्यमांनीच द्यावीत ही नम्र विनंती...

तळटीप- ज्या माध्यमकर्मींनी अशा प्रकारच्या तथाकथित विद्यार्थी/ युवा नेत्याला जन्म दिलाय त्यांनी आणि पिडीत, पिछडे कन्हैया समर्थकांनी कृपया उत्तर द्यावं. उत्तर न दिल्यास वॉलवर येऊन, मेसेंजरमधून उत्तर मिळेपर्यंत छळण्यात येईल.

© अहमद शेख
९९८७४७९२१३

No comments:

Post a Comment