Tuesday, 6 September 2016

किस्से स्वप्नातल्या आयुष्याचे

एक स्वप्न...
अवघा १७ वर्षांचा होतो मी..
आणि माझा मामा माझ्यापासून दूरावला गेला, कायमचा...
परत कधीही न येण्यासाठी
कँसरने ग्रसित माझा मामा डॉक्टर होता, डॉक्टरांना कुठलाही रोग होत नाही, हा माझा समज खरंच काल्पनिक होता. माझ्या आईचं त्याच्यावर खूप प्रेम...तीचा धाकटा भाऊ होता तो. रक्ताची उलटी होऊन अखेरचा श्वास घेतला त्याने, बरेच दिवस लागले आईला या धक्यातून सावरायला...
आयुष्याच्या मुख्य वळणावर माझं आदर्श व्यक्तिमत्व, माझं छत्र हरवलं...
छोटसं कुटूंब होतं त्याचं, बायको, १० वर्षांचा 
एक मुलगा, एक मुलगी १४ वर्षांची
इनफॅक्ट मी त्याच्या मुलीवर प्रेमही करायचो, दर शनिवार-रविवार आमच्या गावाला यायचे ते..
आणि मी तिच्यासाठी तिच्या प्रतिक्षेत लिहिलेल्या आठ दिवसांच्या ढिगभर कविता तिला ऐकवायचो...
कधीही व्यक्त न केलेलं अबोल प्रेम होत ते, परंतु खऱ्या अर्थानं बहरलेलं. आजही गुलाम अलींच्या गज़लांमध्ये ती अवतरलेली दिसते मला, वायोलिनच्या सूर तरंगांमध्ये लाजून हसणारा तिचा मुखडा लुप्त होताना दिसतो मला...विणेसारखी निरागस आणि संतुरा सारखी चंचल-अविचल, टपोर जांभूळ डोळे, तेजोमय कांती, तो सूर्य काजळ संध्येत बुडताना दिसतोय मला...
मामी उर्दु शाळेत शिक्षिका होती, मामा गेल्यानं ती एकटी पडली आणि दोन वर्षांनी तीनं दुसरं लग्न केलं, शरियत मधली तरतूद तिच्या पथ्यावर पडली, कुणालाही न विचारता किंवा विश्वासात न घेता लग्न केल्यामुळे कडाक्याचं भांडण झालं. संबंध कायमचे तुटले.. आणि माझं प्रेमही माझ्यापासून विभक्त झालं, कदाचित कायमचं... जाता- जाता विरह नावाचा एक नवा विषय देऊन गेलं... कवितेसाठी, माझ्यातल्या प्रतिभा फुलण्यासाठी...असो,
आम्हाला शेती जेमतेम पावणे सहा एकर, वडील शेती करायचे. शेतीला जोडधंदा म्हणून सायकलच्या दुकानापासून ते दारूच्या भट्टीपर्यंत सगळे उद्योग केले, पण स्वतः दारूच व्यसन सोडलं नाही. दारुमुळे घरात अठराविश्वे दारिद्र्य.  तसं ते आमच्या पाचवीलाचं पुजलेलं... बहीणीचं लग्न 
कसंबसं लावून दिलं, तिचं सुदैव म्हणून ती चांगल्या घरात गेली. आमच्या पाचपैकी आम्ही चौघेच राहीलो. एकतर शेती परवडेना त्यात भावकी सोबतचे वाद, म्हणून बापानं स्वत:च्याच घरात गळफास लाऊन घेतला. मी दरवाजा उघडला तर समोर बाप फासावर लटकलेला, काय करावं काय सुचेना.. तोपर्यंत मागून आई आली आणि पुढे जे काही झालं ते आजही किंवा इथून पुढेही कदाचित  मी शब्दबध्द करु शकणार नाही... खऱ्या अर्थानं अवलिया माणूस म्हणजे माझा बा...या अवलियाचं आयुष्यही तितकचं गमतीदार आणि रंजक. कधी फ़ुरसत मध्ये सांगेन... 
माझा एक मित्र होता प्रमोद नावाचा. लहानपणीच वडीलांचं प्रदीर्घ आजारानं निधन झालं. एक बहीण जिचं लग्न झालेलं होतं. घरात आई आणि हा, दोघेच जण. माझ्यापेक्षा पाच वर्षांनी मोठा, प्रचंड हुशार आणि महत्वकांक्षी. गरिबीमुळं दहावी नंतर पाच वर्षांचा गॅप पडला, पण शिकण्याच्या जिद्दीमुळं पाच वर्षांनंतर अकरावी ला प्रवेश घेतला आणि तो माझ्या वर्गात आला. बार्शीत माझा रुम पार्टनरही झाला. आम्ही सगळी आगाव पोरं, पण त्यानं आयुष्यात बऱ्याच खस्ता खाल्यामुळं तो गांभीर्यानं अभ्यास करत असे. तरी पण एका मुलीवर प्रेम करून बसला. आणि "तु कर भावा मी हाय" असली आमची फुशारकी आम्हालाच महागात पडली. कळालं पोरीचा मामा बार्शीतला एक नंबरचा गुंड. परम्यासकट आम्हीपण मार खाल्ला, आणि चौथ्या दिवशी रुमही सोडावी लागली.  
परत आयुष्यात कधीही असली लफडी करण्याचा कुणाला सल्ला दिला 
नाही. बारावी कशीबशी पार पडली. मला ७७ तर प्रमोदला ८० टक्के एवढे गुण २००८ साली मिळाले. त्याचा डी.एड ला नंबर लागला तर आम्ही सिव्हील ड्राफ्ट्समन चा डिप्लोमा  आणि मुक्त विद्यापीठतून बी.ए करु लागलो. दरम्यान  मुंबईपर्यंत पोहोचलो, एके दिवशी असाच सहज कार्यालयात बसलो असताना गावातून फोन आला प्रमोदनं आत्महत्या केली, शेतामधल्या आंब्याच्या झाडाला गळफास घेतला होता त्यानं. गरिबी आणि दारिद्र्यातून बाहेर निघण्याचा अयशस्वी प्रयत्न म्हणजे प्रमोदची आत्महत्या होती. 
माझा एक भाऊ होता दररोज संध्याकाळी न चुकता मला फोन करणारा, दर आठवडा हजार-बाराशे रुपये माझ्या अकाउँटमध्ये पाठवणारा. त्याचा संसार सुखात सुरु होता. माझ्यापेक्षा मोठा भाऊ. काका विहरीत पडून वारले म्हणून तो बायको लेकरासह मोटारसायकलवर पुण्याहून आला होता. विधी आटोपून बायकोला आणि सासऱ्याला बसमध्ये बसवून पुण्याच्या दिशेने निघाला इंदापूर नावाच्या गावाजवळ समोरुन येणाऱ्या भरधाव ट्रकने धडक दिली छातीला जबर मार बसला, रुग्णवाहीकेमधून इस्पितळात जात असतानाच त्याला मृत्यूनं कवाटाळलं कदाचित त्या क्षणी मी त्याच्या सोबत राहीलो असतो तर... असं म्हणतात शेवटच्या क्षणी तो काहीतरी बोलला. माहीत नाही काय बोलला, पण नक्कीच मरतानासुध्दा त्याचं ह्रदय आमच्यासाठी द्रवले असणार, तो रडला असणार आमच्या काळजीत, पण त्याला काय माहीती, की कुणाच्या मृत्यूनं किंवा दुरावण्यानं जग थांबत नाही. घड्याळाचे काटेही थांबत नाहीत. आम्ही आमच्या घरात आता दोघेच उरलो आम्ही पण नाही थांबलो, मी मुंबईत परत आलो आई बहीणीकडे गेली, गेल्या वर्षभरापासून वाट बघतोय त्याच्या फोनची, पैसे पाठवलेल्या मेसेजेसची.... घर आता एकटं पडलयं, भेगाळलयं. ज्या घरात क्रिकेट पाहण्यासाठी अख्खा गाव यायचा,ते घर अंधारात बुडून गेलय कधीच. मला आठवतोय तो, टी-ट्वेंटीचा पहिला वर्ल्ड कप, श्रीसंत ने मिसबाहचा अचूक टिपलेला झेल. काय जल्लोष केला होता आम्ही... आयुष्यात पुन्हा अशा जल्लोषाची कधी वेळच आली नाही ... आमच्या बापाला बुध्दीबळाचा आणि क्रिकेटचा फारच छंद आपसूकच आमच्यातही तो उतरला. ज्या अंगणात दिवस रात्र बुद्धीबळाचे डाव रमायचे, असं ऐकलयं तिथे फक्त पालापाचोळा आणि धुळ शिल्लक राहीलीय. अनेक दिवसांची धावपळ करुन हत्ती,घोडे, सोंगट्या सर्वजण दमून भागून भिंतीमधल्या  एका कपाटामध्ये निपचित पडले आहेत. एकेकाळी एकमेकांवर आक्रमण करणारे, एकमेकांचे रक्त वाहण्यासाठी आसुसलेले हे काळे-गोरे हत्ती, घोडे, सोंगट्या आपापल्या तलवारी म्यान करुन मिळून मिसळून रहातायत असं ऐकलय मी. त्यांच्यावर धुळ चढलीय, आळशी झालेत सर्व. शौर्य, रण, रणांगण, वीरत्व, स्वाभिमान, कणा इत्यादी गोष्टी त्यांच्यात आता तसूभरही शिल्लक नाहीत, आणि यामुळेच त्यांचा अंत जवळ आलेला आहे, हे लक्षात येत नाहीये त्यांच्या... माझ्या अनपेक्षित अंताला मी कुणालाच जबाबदार धरु शकत नाही, पण या योध्द्यांचा करुण अंत झाल्यास कदाचित ती जबाबदारी माझीच असेल. कधी कधी मी माझ्यावरच हसतो, नाही नेहमीच..
मुंबई नावाच्या मायानगरीत नशीब घेऊन फिरतोय, सोबती आहेत बरेच हितचिंतक. समुद्रकिनारी, काळ्याभोर रस्त्यांवर, कधी गर्द वनराईत, तर कधी लोकलमध्ये, मी मुंबईतल्या गर्दीत शोधतोय एखादा चेहरा भावासारखा-बापासारखा-प्रमोदसारखा, मामा सारखा त्याच्या मुलीसारखा... कान देऊन ऐकतोय सगळे आवाज, सगळ्या सार्वजनिक सुचना, गणपतीची गाणी, आरत्या, मशिदींवरची अजान.....  सगळं... सगळं  काही ऐकतोय, या आशेनं, की एखादा आवाज ऐकू यावा ओळखीचा...
 फार भयानक स्वप्न पडतात मला, कुणालाही पडू नयेत अशी स्वप्न... स्वप्नाला वास्तव समजणारे बघितले, पण वास्तवाला स्वप्न समजून जगणारे खचितच, त्याच परंपरेतला मीही...पुन्हा भेटुच नवीन स्वप्नासह....

Wednesday, 24 February 2016

राष्ट्र सर्वतोपरी महान होय...

     आज काल देशात फार विचित्र वातावरण निर्माण झालय, लोकं म्हणतायत अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आलीय,  मी एक सामान्य विद्यार्थी आणि या देशाचा नागरिक म्हणून , असा अन्याय का होतोय हे तपासण्यासाठी थोडासा अभ्यास करावा म्हटलं  (सकाळी -सकाळी पेपर वाचून वगैरे अचंभित नाही झालो इंटेलेक्चुअल महानुभवांसारखं , कारण आजकाल सर्वांनाच माहिती आहे कि कोण काय लिहितंय  ते , असो )आणि अभ्यासाअंती हे लक्षात आलं, कि आम्हाला जे काही शिकवलं जातंय ते खोटं  आहे कि काय ?  जी अभिव्यक्ती स्वातंत्र्याची भाषा बोलली जातीय ती अभिव्यक्ती नसून देशद्रोह आहे असं  वाटायला लागलं , कारण आम्हाला कायद्याचं ज्ञान व्हावं  म्हणून कलम  १९ , १९ अ हे शिकवलं गेलं ज्याच्यामध्ये देशाच्या नागरिकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य घटनेने बहाल केलेलं आहे , हे स्वातंत्र्य बहाल करत असताना हे पण आम्ही शिकलो कि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उपयोग करत असताना काही नैतिक बंधनं नागरिकांनी स्वतःवर घालून घेतली पाहिजेत उदा. आपल्या उक्ती आणि कृतीतून काही देशविघातक कृत्य घडू नये, देशाच्या सार्वभौमत्वाला, संप्रभूतेला आणि अखंडतेला बाधा पोहचेल असे कृत्य किंवा असे कृत्य करण्यास इतरांना उद्युक्त करू नये. दुसरं  आम्ही असं  शिकलो कि कलम १२४ अ मध्ये राष्ट्रद्रोहाची  साधी, सरळ आणि सोपी व्याख्या त्यामध्ये अंतर्भूत केलेली आहे जे कि वरील पैकी कृत्य केल्यास अथवा करण्यासाठी चीथाविल्यास तो देशद्रोह मानला जातो. तिसरं  आम्ही हे शिकलो कि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर आणि देशाचे न्यायव्यवस्थेचे सर्वोच्च मानबिंदू असलेले सर्वोच्च न्यायालय याच्यावर विश्वास आणि निष्ठा ठेवावी. आम्ही हे हि शिकलो कि कुठलीही व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीपेक्षा राष्ट्र सर्वोतोपरी महान आहे , देश सेवा हीच ईश्वर सेवा, देशाचा मान सम्मान म्हणजेच स्वतःच्या आईचा मान सम्मान.  आणि हे शिकल्या मुळे  पवन कुमार सारखे माझे मित्र अवघ्या २३ व्या वर्षी देशासाठी शहीद झाले, अशाच देशभक्ती पोटी लान्सनायक हनुमंथप्पा सारखे वीर जवान ६-६ दिवस बर्फाखाली गाडले गेले …
     आणि जेंव्हा मी पुस्तकातून बाहेर आलो तेंव्हा असं  वाटलं  कि जे काही वाचलं  त्याचा इथे काहीच संदर्भ लागत नाहीये, फली  नरिमन सारख्या वकिलांनी देखील एका वृत्तपत्राच्या माध्यमातून राष्ट्राद्रोहाची व्याख्या करताना वाचकांमध्ये संभ्रम निर्माण करावा.  देशाचे तुकडे करण्याची भाषा करणाऱ्यांस जेरबंद  केल्यास अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणल्याचा आव आणला जातोय, पुन्हा जगाचा नागरिक असल्याचं  सांगून मार्क्सला रेटण्याचा प्रयत्न केला जातोय, मार्क्सला माझा विरोध नाहीये पण " वसुधैव कुटुंबकम " आणि  " हे विश्वची माझे घर " हि संस्कृती आहेच कि आमची. मी जगाचा नागरिक म्हणायचं आणि भारतीय संविधान, भारतीय संसद , भारतीय न्याप्रणाली यांना पायदळी तुडवायचं , जगाचा नागरिक या नात्यानं मग पाकिस्तान जिंदाबादच्या आणाभाका घ्यायच्या , जगाचा नागरिक या नात्यानं भारताचे तुकडे करायचे, जगाचा नागरिक या नात्याने काश्मीरसाठी हौतात्म्य पत्करलेल्या जवानांची कचरा किंमत करून तो वेगळा करण्यासाठी गरळ ओकायची, मकबूल भट आणि अफजल गुरु सारख्या  आतंकवाद्यांचे समर्थन करायचे आणि नेमका इथेच फरक आढळतो तो म्हणजे लाल क्रांती आणि राष्ट्रवाद यांच्या मध्ये. लाल  क्रांती सांगते आम्ही जगाचे नागरिक (जाऊ तिथे गोंधळ घालू ), राष्ट्रवाद सांगतो राष्ट्र प्रथम. आणि दुसरा अतिमहत्त्वाचा मुद्दा म्हणजे भारतात राहून भारतविरोधी घोषणा डाव्यांनी दिल्या, तरीही हे सगळं सहन करण्याची ताकद  हि सहिष्णुता भारतीयांना  मार्क्स ने किंवा माओ ने नाही दिली. ती दिली इथे उपजतच  असणाऱ्या भारतीय संस्कृतीतील संस्काराने. हे कुणालाही सोयीस्करपणे विसरता येणार नाही.
     जे काही त्या विद्यापीठात झालं त्याची दखल अंतरराष्ट्रीय स्तरावरील माध्यमांनी देखील घेतील, पाकिस्तान वगेरे तर सोडाच,त्यांना तर आनंदाच्या उकळ्याच फुटत आहेत. पण अल जझीरा नावाच्या कतार येथील न्यूज चॅनेल देखील याची दखल घ्यावी  ! ज्या चॅनेलची सुरुवातच  ओसामा बिन लादेनच्या कारवाया आणि ओसामाने बनवलेले विडीयो दाखविण्यापासून केली, त्या  चॅनेलने  देखील या घटनेची दखल घेतली, किंबहुना  ते अशा काही घटना भारता मध्ये घडाव्या याच्याच प्रतीक्षेतच  होते आणि तसं  झालं  देखील,  अशा घटनेकडे हे आंतरराष्ट्रीय माध्यम  समूह लादेन किंवा अतिरेकी कारवायांना समकक्ष   ह्या जे.एन. यू मधील कारवाया असे बघत असतील  तर निश्चितच हि चिंतेची बाब आहे . आत्तापर्यंत एक सुसंस्कृत युवकांचा देश म्हणून ज्या देशाचा नावलौकिक जगभर होता त्या देशात  आता देशविरोधी आणि राष्ट्रद्रोही  युवकांची फळी निर्माण होते आहे, हे जगाला दाखविण्याचा  उत्साह हा या परदेशी वाहिन्यांमध्ये  भरभरून वाहत आहे. आणि भारतासारख्या देशासाठी हि धोक्याची घंटा  म्हणवी लागेल. एकीकडे मुस्लिम तरुण ISIS  सारख्या अतिरेकी संघटनेच्या जाळ्यात ओढला जात असून, दुसरीकडील सुजाण युवकांची पिढी जी उच्चशिक्षित आहे, ती देखील जर भारतात राहून  भारतच्याच  विरोधात आग ओकत असेल तर, मी म्हणेन ISIS  पेक्षाही मोठी धोकादायक बाब भारतासाठी आहे . अल जझीरा किंवा लॉस  एंजलीस टाइम्स असेल यांच्यासाठी हि बातमी असेल पण हि माझ्या देशासाठी धोक्याची सूचना आहे हे इथल्या प्रत्येक नागरिकाने आणि युवकाने समजून घेतले पाहिजे. माझा देश अबाधित राहिला तर मी अभिव्यक्त होऊ शकेन , माझा देश अबाधित राहिला तर मी सुखाची झोप घेऊ शकेन नाहीतर मला हि युद्धभूमीवर जगण्याची वेळ येईल , माझा देश, माझं  संविधान, माझ्या देशातली न्याय प्रणाली अबाधित राहिली तरच मी कॉलेजला वेळेवर पोहोचेन, माझे बाबा वेळेवर कामाला जातील आणि वेळेवर घरी येतील, माझी आई बिनधास्तपणे भाजीवाल्याशी भांडू शकेल, माझा छोटा भाऊ बिन्दास्तपणे मस्ती करेल कधीही त्याची काळजी वाटणार नाही, माझी बहिण नेहमी सुरक्षित असेल,  माझी लोकल मी वेळेवर पकडेल , सुट्टीच्या दिवशी मित्र मैत्रिणींसोबत अख्खी मुंबई फिरेन चौपट्यावर सेल्फी काढेन, मी कोणत्याही मुद्द्यावर तासन तास वाद घालेन, मी प्रेम करेन  ( मित्रावर ,मैत्रिणींवर , कॉलेजवर, माझ्या देशावर ), मी मारामारी करेल, भांडण करेल , मैत्री करेन, मी अभ्यास करेन , देशासाठी माझ्या समाजासाठी जगेन … जर हि अखंडता राहिली तर …
 फिरण्याचं, बोलण्याचं, खाण्या-पिण्याचं , पैसे कमावण्याचं - गमावण्याच, रडण्याचं, हसण्याचं ,बागडण्याचं, ओरडण्याचं, बोंबलण्याचं, लिहीण्याचं, वाचण्याचं,पाहण्याचं, ऐकण्याचं, विद्रोही गाणी म्हणण्याचं - देशभक्तीची गाणी म्हणण्याचं, लाल सलाम जिंदाबाद म्हणण्याचं - वन्दे मातरम म्हणण्याचं , डावं  आणि अति डावं होण्याचं  - उजवं  आणि अति उजवं  होण्याचं, लाल क्रांती या भारतात करण्यासाठीची स्वप्न पाहण्याचं - या भारताला विश्वगुरु बनविण्याच्या स्वप्नासाठी प्राणार्पण करण्याचं, मार्क्सला आणि माओ ला भारतावर लादण्याचं - याचं मार्क्सला आणि माओला भारताबाहेर फेकून देण्याचं, स्वार्थापोटी देशभक्तीचा आव आणण्याचं - राष्ट्र प्रथम मानण्याचं , खोट्या बातम्या पसरविण्याचं - जीव तोडून सत्य बाहेर आणण्याचं , रविश आणि निखिल वागळे यांना त्याचं म्हणणं  रेटण्याचं - अर्णव आणि सुधीरला बातमी देण्याचं, इतक्या सगळ्या गोष्टींचं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जगण्याचं आणि जागविण्याचं स्वातंत्र्य अबाधित ठेवायचं असेल तर हा देश अबाधित राहिला पाहिजे याचे तुकडे होता कामा नये …. बस्स !!!  याउपर आणखी काय लिहावं आणि काय सांगावं  ?

अहमद शेख
९६९९९३६५७५
ashaikh251@gmail.com
www.avaliya.blogspot.in






  

Wednesday, 20 January 2016

कालबाह्य क्रांतीच्या हट्टाचा बळी



“मला विज्ञान आवडायचं, ग्रहतारे आवडायचे, निसर्ग आवडायचा आणि मी माणसांवरही प्रेम करायचो. मी हे विसरून गेलो कि, माणसं निसर्गापासून फारच पूर्वी तुटलेली आहेत. आपल्या भावना आपल्या स्वतःच्या राहिलेल्या नाहीत. आपलं प्रेम बनावटी आहे. आपले विचार गंजलेले आहेत.आपल्यातील सर्जनशीलता, आयुष्य कलेचा आधार घेऊन उभी रहात आहे. वेदना सहन करण्याची तयारी ठेवल्याशिवाय प्रेम करणं शक्यच राहिलेलं नाही“ हे शब्द आहेत रोहित वेमूला याचे, त्याने मृत्यूपूर्वी लिहिलेल्या पत्राच्या, मराठी अनुवादातील एक महत्वाचा मुद्दा म्हणजे वरील चार ओळी.

जेंव्हा माणूस आत्महत्येस प्रवृत्त होतो तेंव्हा एकतर तो कुणाच्यातरी दबावामुळे,राग,मनस्ताप किंवा हतबलतेमुळे, दुसरी गोष्ट अशी कि तो स्वतःला दोषी मानून, सभोवतालच्या वातावरणाला कंटाळून किंवा चुकीचा मार्ग निवडल्यामुळे आणि तिथून परत येण्याच्या वाटा बंद झाल्यामुळे. साधारणतः या गोष्टी एखाद्या व्यक्तीच्या जीवनाच्या अंतासाठी कारणीभूत ठरतात. खरं तर रोहितचं ते पत्र वाचल्यानंतर कितीही कठोर व्यक्ती असला तरी त्याच्या डोळ्यांतील आसवांना आवरू शकणार नाही, आणि खरंच या पत्राचा गर्भितार्थ समजून घ्यायला आपण कुठेतरी चुकतोय असं मला वाटतंय. संपूर्ण पत्र त्याने अतिशय विचार पूर्वक, राजकारणी आणि वेगवेगळ्या संघटनांच्या विचारधारेच्या वरती जाऊन लिहिलंय त्यामुळे त्याचं राजकारण तर होऊच नये पण नेमकं मानव जातीला आपण काय दिलं पाहिजे? का त्याच्या आत्म्यात आणि शरीरात अंतर पडल्याचं भासलं, आत्म्याचं अस्तित्व तो मानतो,तो प्रत्येकाच्या ठायी असतो असतो हेही त्याला मान्य. परंतु केंव्हा ?? जेंव्हा वेळ निघून गेली तेंव्हा.  आणि त्याच आत्मक्लेशाने त्याला असे पाउल उचलायला भाग पाडले नाही कशावरून ? गटातटांच्या, पक्षीय, जातीय राजकारणाच्या वर जाऊन विचार करण्याचा सल्लाच एक प्रकारे रोहितने आपल्याला दिलाय,  खरचं तो ज्या मार्गावर चालला होतं तो मार्ग कितपत योग्य होता? ज्या त्याच्या अपेक्षा त्या मार्गावरून जाताना पूर्ण करण्याची इच्छा होती त्या मार्गाने त्याच्या असलेल्या समाजाप्रती, देशाप्रतीच्या अपेक्षा कधीच पूर्ण होणाऱ्या नव्हत्या किंवा तो विचार आणि ती कृती कधीच योग्य नव्हती. ना ही स्थलपरत्वे आणि ना ही कालपरत्वे. हा विचार कारण गरजेचा आहे. तो एखाद्या व्यक्तीचं किंवा संघटनेचं नाव लिहून रिकामा झाला असता पण त्यानं असं केलं नाही. हि वाट कदापि त्याला त्याच्या ध्येयापर्यंत घेऊन जाणारी नव्हती म्हणून तो पुढे लिहितो “ कदाचित मी आजवर कायमच जग समजून घेण्यात चूक केली असेल.प्रेम,वेदना,आयुष्य,मरण काहीच समजलं नसेल मला तातडी कसलीच नव्हती, पण मी सतत धावत होतो. आयुष्य सुरु करण्यासाठी अनावर. सारखं . काही लोकांसाठी आयुष्य हाच शाप ठरतो. माझा जन्म हा जीवघेणा अपघात होता” 

ज्या विचारसरणीचा तो अवलंब करत होता कदाचित ती चुकीची आहे कि काय म्हणून हे द्वंद्व त्याच्या मनात चालू असावं, काहीतरी शाश्वत शोधण्याच्या वेडात तो फसवेगिरीच्या,कालबाह्य झालेल्या बुरसट विचारांच्या खोल गर्तेत गेला होता जिथं केवळ अंधःकार आणि अन्धःकारच होता, त्या अंधारातूनही तो बाहेर निघाला असता परंतु बाहेर निघण्याचा जो मार्ग होता त्यालाच तो आत्तापर्यंत विरोध करत आलेला होता त्यामुळे प्रायश्चित आणि पश्चातापाने त्याला हा निर्णय घेण्यास भाग पाडले. अनेक धाडसी आंदोलनांचं नेतृत्व करणारा, बीफ फेस्टिवल, कीस ऑफ लव सारखे कार्यक्रम आयोजित करणाऱ्या, याकुब च्या फाशीचा विरोध करणाऱ्या संघटनेचा तो धाडसी कार्यकर्ता होता , जर त्याला मनात राग धरून, मनस्ताप करून आत्महत्या करायची होती तर त्यांने नक्कीच कुणाच्या तरी माथी हे खापर फोडलं असतं. पण हे हि सत्य आहे कि जेंव्हा माणसाला आयुष्यात सत्य गवसते त्यावेळी त्याच्यासाठी पृथ्वीवरील जीवन, संसारिक मोह माया हे सर्व काही शून्य होऊन जाते आणि तो अभूतपूर्व अशा निर्णयाला सामोरे जातो त्याचेच उदाहरण म्हणजे रोहित ने केलेली आत्महत्या होय.

माध्यमांनी व तथाकथीत बुद्धीवाद्यांनी (जे स्वतः नक्षलवादी कारवायांना पाठींबा देतात ) या गोष्टीवर चिंतन, विचार मंथन करावे न कि चार टाळकी घेऊन कशा प्रकारे रोहितचा खून झाला  यावर चर्चेच गुर्हाळ चालवावे. आजकाल तर निखील वागळे नावाच्या नामांकित पत्रकाराला शीतल साठे नावाची एक नवीन विचारवंत, समाजसुधारक अशा प्रकारच्या चर्चेसाठी लाभलेली आहे आणि ते त्यांचा पुरेपूर उपयोग करून घेत आहेत. मी मराठी लाइव्ह नावाच्या वृत्तपत्राने तर आपल्या वर्तमान पत्रामधील जागा भरण्यासाठी याचा पुरेपुरे फायदा उचलला कुण्यातरी समाजसेवकाचा लेख आपल्या वृत्तपत्रामध्ये छापला आणि त्याने त्याच्या ठायी होते नव्हते तेवढे शब्द कसेही ओबड धोबड गुंफून, कुठलाही अभ्यास न करता संपादकांच्या हाती देऊन टाकले किमान संपादकांनी तरी त्याचा विचार करायला हवा होता. असो, 

जो व्यक्ती मेला आहे मग तो कसाही असू देत त्याच्या नावाचं राजकारण राजकारण्यांनी करू नये, माध्यमांनी आपली नितीमुल्ये विसरून त्याच्या प्रेताचा मसाला करून तो आपल्या चॅनेल वरून विकू नये एवढी साधी गणितं न समजण्यासारखी भारतीय जनता राहिलेली नाहीये आणि म्हणूनच त्या विद्यार्थ्याने त्याच्या भूतकाळात तो किती चांगला होता/ नव्हता, याचं विवेचन मी इथे करत नाहीये कारण मला त्या बुद्धिवाद्यांच्या रांगेत जाऊन बसायचं नाहीये किंवा कुठल्याच प्रकारे माझी किंवा माझ्या संघटनेची पोळी त्याच्या  आगीच्या चितेवर भाजून घ्यायची नाहीये.  जर ही हत्या असेल तर ती दुसऱ्या तिसऱ्यांनी कुणी केलेली  नसून स्वतःला पुरोगामी म्हणवणाऱ्या प्रतिगामी शक्तींच्या हट्टाने हि हत्या केलीय. आपला क्रांतीचा हट्ट, मार्क्स, लेनिन, माओ, चीग्वेरा यांना भारतामध्ये रक्तरंजित इतिहास घडविण्यासाठी घुसविण्याचा हट्ट, पण ते तर कधीच कालबाह्य झाले हे ह्यांच्या डोक्यात अजून घुसत नाहीये, भारतासारख्या अनेको जातीधर्माच्या लोकांच्या समूहाला हि परकीय विचार धारा लागू पडत नाही किंबहुना ती लागू करताना त्यांच्याच पदरी निराशा येतेय आणि त्याचा परिणाम म्हणजे कालची हि दुर्दैवी घटना. म्हणून आता यांनी बदलावे  आणि कालबाह्य क्रांतीचा हट्टही सोडून द्यावा हे हि तितकेच सत्य.    




अहमद शेख 
९६९९९३६५७५
ashaikh251@gmail.com