Wednesday, 24 February 2016

राष्ट्र सर्वतोपरी महान होय...

     आज काल देशात फार विचित्र वातावरण निर्माण झालय, लोकं म्हणतायत अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आलीय,  मी एक सामान्य विद्यार्थी आणि या देशाचा नागरिक म्हणून , असा अन्याय का होतोय हे तपासण्यासाठी थोडासा अभ्यास करावा म्हटलं  (सकाळी -सकाळी पेपर वाचून वगैरे अचंभित नाही झालो इंटेलेक्चुअल महानुभवांसारखं , कारण आजकाल सर्वांनाच माहिती आहे कि कोण काय लिहितंय  ते , असो )आणि अभ्यासाअंती हे लक्षात आलं, कि आम्हाला जे काही शिकवलं जातंय ते खोटं  आहे कि काय ?  जी अभिव्यक्ती स्वातंत्र्याची भाषा बोलली जातीय ती अभिव्यक्ती नसून देशद्रोह आहे असं  वाटायला लागलं , कारण आम्हाला कायद्याचं ज्ञान व्हावं  म्हणून कलम  १९ , १९ अ हे शिकवलं गेलं ज्याच्यामध्ये देशाच्या नागरिकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य घटनेने बहाल केलेलं आहे , हे स्वातंत्र्य बहाल करत असताना हे पण आम्ही शिकलो कि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उपयोग करत असताना काही नैतिक बंधनं नागरिकांनी स्वतःवर घालून घेतली पाहिजेत उदा. आपल्या उक्ती आणि कृतीतून काही देशविघातक कृत्य घडू नये, देशाच्या सार्वभौमत्वाला, संप्रभूतेला आणि अखंडतेला बाधा पोहचेल असे कृत्य किंवा असे कृत्य करण्यास इतरांना उद्युक्त करू नये. दुसरं  आम्ही असं  शिकलो कि कलम १२४ अ मध्ये राष्ट्रद्रोहाची  साधी, सरळ आणि सोपी व्याख्या त्यामध्ये अंतर्भूत केलेली आहे जे कि वरील पैकी कृत्य केल्यास अथवा करण्यासाठी चीथाविल्यास तो देशद्रोह मानला जातो. तिसरं  आम्ही हे शिकलो कि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर आणि देशाचे न्यायव्यवस्थेचे सर्वोच्च मानबिंदू असलेले सर्वोच्च न्यायालय याच्यावर विश्वास आणि निष्ठा ठेवावी. आम्ही हे हि शिकलो कि कुठलीही व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीपेक्षा राष्ट्र सर्वोतोपरी महान आहे , देश सेवा हीच ईश्वर सेवा, देशाचा मान सम्मान म्हणजेच स्वतःच्या आईचा मान सम्मान.  आणि हे शिकल्या मुळे  पवन कुमार सारखे माझे मित्र अवघ्या २३ व्या वर्षी देशासाठी शहीद झाले, अशाच देशभक्ती पोटी लान्सनायक हनुमंथप्पा सारखे वीर जवान ६-६ दिवस बर्फाखाली गाडले गेले …
     आणि जेंव्हा मी पुस्तकातून बाहेर आलो तेंव्हा असं  वाटलं  कि जे काही वाचलं  त्याचा इथे काहीच संदर्भ लागत नाहीये, फली  नरिमन सारख्या वकिलांनी देखील एका वृत्तपत्राच्या माध्यमातून राष्ट्राद्रोहाची व्याख्या करताना वाचकांमध्ये संभ्रम निर्माण करावा.  देशाचे तुकडे करण्याची भाषा करणाऱ्यांस जेरबंद  केल्यास अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणल्याचा आव आणला जातोय, पुन्हा जगाचा नागरिक असल्याचं  सांगून मार्क्सला रेटण्याचा प्रयत्न केला जातोय, मार्क्सला माझा विरोध नाहीये पण " वसुधैव कुटुंबकम " आणि  " हे विश्वची माझे घर " हि संस्कृती आहेच कि आमची. मी जगाचा नागरिक म्हणायचं आणि भारतीय संविधान, भारतीय संसद , भारतीय न्याप्रणाली यांना पायदळी तुडवायचं , जगाचा नागरिक या नात्यानं मग पाकिस्तान जिंदाबादच्या आणाभाका घ्यायच्या , जगाचा नागरिक या नात्यानं भारताचे तुकडे करायचे, जगाचा नागरिक या नात्याने काश्मीरसाठी हौतात्म्य पत्करलेल्या जवानांची कचरा किंमत करून तो वेगळा करण्यासाठी गरळ ओकायची, मकबूल भट आणि अफजल गुरु सारख्या  आतंकवाद्यांचे समर्थन करायचे आणि नेमका इथेच फरक आढळतो तो म्हणजे लाल क्रांती आणि राष्ट्रवाद यांच्या मध्ये. लाल  क्रांती सांगते आम्ही जगाचे नागरिक (जाऊ तिथे गोंधळ घालू ), राष्ट्रवाद सांगतो राष्ट्र प्रथम. आणि दुसरा अतिमहत्त्वाचा मुद्दा म्हणजे भारतात राहून भारतविरोधी घोषणा डाव्यांनी दिल्या, तरीही हे सगळं सहन करण्याची ताकद  हि सहिष्णुता भारतीयांना  मार्क्स ने किंवा माओ ने नाही दिली. ती दिली इथे उपजतच  असणाऱ्या भारतीय संस्कृतीतील संस्काराने. हे कुणालाही सोयीस्करपणे विसरता येणार नाही.
     जे काही त्या विद्यापीठात झालं त्याची दखल अंतरराष्ट्रीय स्तरावरील माध्यमांनी देखील घेतील, पाकिस्तान वगेरे तर सोडाच,त्यांना तर आनंदाच्या उकळ्याच फुटत आहेत. पण अल जझीरा नावाच्या कतार येथील न्यूज चॅनेल देखील याची दखल घ्यावी  ! ज्या चॅनेलची सुरुवातच  ओसामा बिन लादेनच्या कारवाया आणि ओसामाने बनवलेले विडीयो दाखविण्यापासून केली, त्या  चॅनेलने  देखील या घटनेची दखल घेतली, किंबहुना  ते अशा काही घटना भारता मध्ये घडाव्या याच्याच प्रतीक्षेतच  होते आणि तसं  झालं  देखील,  अशा घटनेकडे हे आंतरराष्ट्रीय माध्यम  समूह लादेन किंवा अतिरेकी कारवायांना समकक्ष   ह्या जे.एन. यू मधील कारवाया असे बघत असतील  तर निश्चितच हि चिंतेची बाब आहे . आत्तापर्यंत एक सुसंस्कृत युवकांचा देश म्हणून ज्या देशाचा नावलौकिक जगभर होता त्या देशात  आता देशविरोधी आणि राष्ट्रद्रोही  युवकांची फळी निर्माण होते आहे, हे जगाला दाखविण्याचा  उत्साह हा या परदेशी वाहिन्यांमध्ये  भरभरून वाहत आहे. आणि भारतासारख्या देशासाठी हि धोक्याची घंटा  म्हणवी लागेल. एकीकडे मुस्लिम तरुण ISIS  सारख्या अतिरेकी संघटनेच्या जाळ्यात ओढला जात असून, दुसरीकडील सुजाण युवकांची पिढी जी उच्चशिक्षित आहे, ती देखील जर भारतात राहून  भारतच्याच  विरोधात आग ओकत असेल तर, मी म्हणेन ISIS  पेक्षाही मोठी धोकादायक बाब भारतासाठी आहे . अल जझीरा किंवा लॉस  एंजलीस टाइम्स असेल यांच्यासाठी हि बातमी असेल पण हि माझ्या देशासाठी धोक्याची सूचना आहे हे इथल्या प्रत्येक नागरिकाने आणि युवकाने समजून घेतले पाहिजे. माझा देश अबाधित राहिला तर मी अभिव्यक्त होऊ शकेन , माझा देश अबाधित राहिला तर मी सुखाची झोप घेऊ शकेन नाहीतर मला हि युद्धभूमीवर जगण्याची वेळ येईल , माझा देश, माझं  संविधान, माझ्या देशातली न्याय प्रणाली अबाधित राहिली तरच मी कॉलेजला वेळेवर पोहोचेन, माझे बाबा वेळेवर कामाला जातील आणि वेळेवर घरी येतील, माझी आई बिनधास्तपणे भाजीवाल्याशी भांडू शकेल, माझा छोटा भाऊ बिन्दास्तपणे मस्ती करेल कधीही त्याची काळजी वाटणार नाही, माझी बहिण नेहमी सुरक्षित असेल,  माझी लोकल मी वेळेवर पकडेल , सुट्टीच्या दिवशी मित्र मैत्रिणींसोबत अख्खी मुंबई फिरेन चौपट्यावर सेल्फी काढेन, मी कोणत्याही मुद्द्यावर तासन तास वाद घालेन, मी प्रेम करेन  ( मित्रावर ,मैत्रिणींवर , कॉलेजवर, माझ्या देशावर ), मी मारामारी करेल, भांडण करेल , मैत्री करेन, मी अभ्यास करेन , देशासाठी माझ्या समाजासाठी जगेन … जर हि अखंडता राहिली तर …
 फिरण्याचं, बोलण्याचं, खाण्या-पिण्याचं , पैसे कमावण्याचं - गमावण्याच, रडण्याचं, हसण्याचं ,बागडण्याचं, ओरडण्याचं, बोंबलण्याचं, लिहीण्याचं, वाचण्याचं,पाहण्याचं, ऐकण्याचं, विद्रोही गाणी म्हणण्याचं - देशभक्तीची गाणी म्हणण्याचं, लाल सलाम जिंदाबाद म्हणण्याचं - वन्दे मातरम म्हणण्याचं , डावं  आणि अति डावं होण्याचं  - उजवं  आणि अति उजवं  होण्याचं, लाल क्रांती या भारतात करण्यासाठीची स्वप्न पाहण्याचं - या भारताला विश्वगुरु बनविण्याच्या स्वप्नासाठी प्राणार्पण करण्याचं, मार्क्सला आणि माओ ला भारतावर लादण्याचं - याचं मार्क्सला आणि माओला भारताबाहेर फेकून देण्याचं, स्वार्थापोटी देशभक्तीचा आव आणण्याचं - राष्ट्र प्रथम मानण्याचं , खोट्या बातम्या पसरविण्याचं - जीव तोडून सत्य बाहेर आणण्याचं , रविश आणि निखिल वागळे यांना त्याचं म्हणणं  रेटण्याचं - अर्णव आणि सुधीरला बातमी देण्याचं, इतक्या सगळ्या गोष्टींचं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जगण्याचं आणि जागविण्याचं स्वातंत्र्य अबाधित ठेवायचं असेल तर हा देश अबाधित राहिला पाहिजे याचे तुकडे होता कामा नये …. बस्स !!!  याउपर आणखी काय लिहावं आणि काय सांगावं  ?

अहमद शेख
९६९९९३६५७५
ashaikh251@gmail.com
www.avaliya.blogspot.in