Sunday, 30 November 2014

बुद्ध आणि कार्ल मार्क्स -बाबासाहेबांच्या नजरेतून

काठमांडू येथे जागतिक बौध्द परिषद   महेंद्र यांच्या अध्यक्षतेखाली. तेथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दि . २० नोव्हेंबर १९५६  ला बुद्ध आणि कार्ल मार्क्स या विषयावर केलेल्या भाषणाचे काही मुद्द्यांचा मुक्त अनुवाद खाली मांडत आहे.
आज या  सभेत बौद्ध धम्म  व साम्य वाद या विषयावर  मी बोलावे असे  परिषदेला उपस्थित आसलेल्या  बहुसंख्यांक लोकांना वाटत असल्याचे मला सांगण्यात आले . हा विषय आकस्मिक पणे माझ्यावर सोपविला गेला असल्याने एवढ्या महान व विस्तृत विषयावर बोलण्याची माझी तयारी झालेली नाही. हा विषय केवळ महान व विस्तृत च नाही तर अत्यंत भारदस्त आहे. ह्या भारदस्त विषयाच्या दडपणाखाली अर्धे अधिक जग सापडलेले आहे , एवढेच नव्हे तर बौद्ध राष्ट्रातील तरुण विद्यार्थी वर्ग सुद्धा ह्या विषयाच्या मगरमिठीत सापडलेला आहे. हि दुसरी बाब मला अत्यंत चिंताजनक वाटते. 
     साम्यवाद हि जीवनप्रणाली त्या जीवनप्रणाली पेक्षा बौद्ध धम्माने सांगितलेली जीवनप्रणाली उत्कृष्ट व सरस आहे , अशी प्रसंसा जोपर्यंत बौद्ध राष्ट्रातील तरुण करत नाही तोपर्यंत बौद्ध  धर्माचे भविष्य उज्वल आहे असे म्हणता येणार नाही . बौद्ध धर्मावरील श्रद्धा दोन पिढ्याही तग धरू शकणार नाही . यास्तव बौद्ध धम्मावर ज्यांची दृढ श्रद्धा आहे  अशा लोकांनी तरुण पिढीस बौद्ध धर्माची महत्ता पटवून देऊन साम्यवादाला बौद्ध धर्मच पर्याय आहे. किंबहुना बौद्ध धर्मच सर्वोत्तम जीवन मार्ग आहे असे सांगणे अत्यंत आवश्यक आहे. हि गोष्ट पटवून दिल्यावरच बौद्ध धर्म  टिकवून धरण्याची अशा बाळगता येऊ शकते . आपण हेही तेवढेच ध्यानात घेतले पाहिजे कि युरोपमधील  बहुसंख्यांक  लोक  व आशियामधील  बहुसंख्यांक तरुण असा दृष्टीकोन बाळगतात कि, आजच्या जगात कार्ल मार्क्स हाच केवळ पूज्यनीय महापुरुष किंवा प्रेषित आहे. त्याचबरोबर ते असाही विचार प्रदर्शित करतात कि, बौद्ध भिक्खू संघातील फार मोठा भाग केवळ निरुपयोगीच नव्हे तर एक मोठे पिवळे संकट आहे . अशा प्रकारची  विचारसरणी कशाचे द्योतक आहे हे भिक्खूंनी लक्षात घेतले पाहिजे आणि कार्ल मार्क्स शी तुलना केली जाऊ शकेल अशा प्रकारे स्वतःला घडवून घेण्याची त्यांची पराकाष्टा करावयास पाहिजे . तेव्हाच बौद्ध धर्माचे श्रेष्ठत्व शाबित केले जाऊ शकेल . 
     साम्यवादाची उपाययोजना संबंधाची विचारसरणी  जुलुम  जबरदस्तीवर आधारलेली आहे. कल्पना करा उद्या  रशियातील साम्यवादी हुकुमशाही बारगळली किंवा तशी चिन्हे दिसू लागली तर काय होईल ? साम्यवादाची अवस्था कशी होईल ? हे जाणून घेण्यासाठी मी निश्चितच उत्सुक राहीन. माझ्या कल्पनेप्रमाणे राज्याच्या मालकीची मालमत्ता बळकावण्यास रशियन लोक परस्परात रक्तपात घडवून आणतील आपापसात लढाया करतील हि परिणीती अपरिहार्य अशीच राहील. कारण रशियातील लोकांनी साम्यवादी विचारसरणी सहजासहजी स्वीकारलेली नाही. आपणहून ती त्यांनी मान्य केलेली नाही ती त्यांच्यावर जबरदस्तीने लादली गेलेली आहे. साम्यवाद प्रस्थापित करताना त्यांना हि भीती  घातली गेली कि, त्यांनी जर साम्यवादी विचार प्रणाली मानली नाही तर  त्यांना फासावर लटकावले जाईल आणि त्यामुळेच ते अजून ती निमुटपणे पाळीत आहेत. हे लक्षात ठेवले पाहिजे कि, भयापोटी कोणतीच  विचारप्रणालीचे मूळ तग धरू शकत नाही. एखादी विचार प्रणाली ग्रहण केली, परंतु कालांतराने तिची धारणा नष्ट झाली तर त्या विचारप्रणालीचे पुढे काय होईल , या प्रश्नाचे  उत्तर जोपर्यंत देता येणार नाही, तोपर्यंत ती  बिम्बिवण्यात काहीच अर्थ नाही. कारण मनोभूमिका तयार केली नसेल तर सत्याची नेहमीच जरुरी भासेल  याच कारणास्तव मला बुद्धांचे नेहमी आकर्षण वाटते. बुद्धाची विचारसरणी हि लोकशाही ची विचारसरणी आहे . 
      अजातशत्रू ला वाज्जींना जिंकवायचे होते. हे  सांगण्यासाठी अजातशत्रू चा सेनापती बुद्धाकडे आला. बुद्ध त्याला म्हणाला कि राजा वज्जींचा पराभव करू शकणार नाही . कारण वज्जी जोपर्यंत  आपल्या जुन्या पद्धतीला  धरून राज्यशासन चालवत आहे तोपर्यंत त्याचा पराभव होणे शक्य  नाही.  इथे वज्जींची  जुनी पद्धत म्हणजे लोकशाही पद्धत होय . यावरून बुद्ध हा लोकशाहीचा मोठा पुरस्कर्ता होता हे स्पष्ट होते. 
     साम्यवादाच्या विजयदुदुम्भीने  बावरून जाऊ नका किंवा भुलून जाऊ नका किंवा  दिपुनही जाऊ नका. तुम्ही जर बौद्ध विचारसरणीचा  व तत्वज्ञानाचा एक दशांस भाग जरी आत्मसात करू शकलात तर साम्यवाद जे काही निर्माण करू इच्छितो, ते तुम्ही  करुणा , न्याय व सद्भावना ह्यांच्या जोरावर घडवून आणू शकाल यात तिळमात्र शंका नाही . 

बाबासाहेबंच्या काही मोजक्या मुद्यांची  मी इथे मांडणी केली आहे  शब्द  मर्यादेमुळे पूर्ण भाषण इथे विवेचीत करणे कठीण आहे .आपण पूर्ण भाषण इंटरनेट द्वारे  मिळवू शकता . 

अहमद शेख -९६९९९३६५७५     

महाविद्यालयीन निवडणुका

     लोकसभे पाठोपाठ , महाराष्ट्रातही सत्तांतरण झाले आणि नवीन सरकारवर नव्या आशा, अपेक्षांचे ओझे आले आणि ते त्यांनी ते पेलण्याचे प्रयत्न हि सुरु केले आणि अशीच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची  गेल्या वीस वर्षांपासूनची अपेक्षा म्हणजे महाविद्यालयातील निवडणुका  पुन्हा सुरु कराव्यात , कॉलेज मधला विद्यार्थ्यांचा कट्टा पुन्हा सुरु व्हावा , पुन्हा मोकळे वातावरण महाविद्यालयांमध्ये निर्माण व्हावे विचारांचे आदान-प्रदान व्हावे, कुणाच्याही दडपणाखाली न येता विद्यार्थ्यांनी कॉलेज कट्ट्यावर उभे राहून बिनधास्त भाषण करावे, आपल्या न्याय्य मागण्यांसाठी आणि हक्कांसाठी सोबतच महविद्यालय हे आपले घर समजून त्याचा विविध अंगांनी  विकास व्हावा याच्यासाठी कॉलेज प्रशासनासोबत चर्चा आणि वैचारिक वादहि  घालता यावा, त्यातून तो विद्यार्थी घडावा महविद्यालयीन जीवनात आलेले अनुभव त्याच्या पुढच्या सामाजिक, शैक्षणिक ,राजकीय किंवा तो ज्या क्षेत्रात जाईल त्या क्षेत्रात त्याला यशस्वी बनण्यास कामी यावेत, पर्यायाने  चांगला  नागरिक या देशासाठी लाभावा, महाविद्यालयातील सामान्य  नेतृत्व पुढे जाऊन आपल्या समाजाचे  व देशाचे  नेतृत्व व्हावे, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातली घराणेशाही संपुष्टात येऊन सामान्य नेतृत्व समोर यावे. राजकारण आणि समाजकारण याचं सामान्यीकरण व्हावे यासाठी महाविद्यालयीन निवडणुका पुन्हा सुरु व्हाव्यात या अपेक्षा घेऊन हि तरुणाई या नव्या सरकार कडे बघत असतानाच, सरकारनेही घोषणा करून टाकली कि पुढच्या वर्षी महाविद्यालयीन खुल्या निवडणुका होतील, आणि सगळीकडे विशेषतः  महाविद्यालय परिसर आणि राजकीय गोटात याची चर्चा रंगली. आता विषय असा आहे कि महाविद्यालयामध्ये निवडणुका व्हाव्यात का ? झाल्या तर का व्हाव्यात ?
      मुख्य म्हणजे तरूणांचं मुख्य केंद्र हे महाविद्यालय परिसर असते, वेगवेळ्या चळवळी चे केंद्र  हि महाविद्यालय परिसरच असते, आणि ज्यांच्या खांद्यावर भविष्याची  जबाबदारी असते असा तरुण घडण्याचं केंद्र हि महाविद्यालयच असते, पण आजकाल हा तरुण फक्त पुस्तकी स्वरुपात घडताना दिसतोय, सामाजिक जाणिवे बद्दल तो सतर्क असला पाहिजे, NSS  चे उपक्रम व कार्यक्रम  आणि एकूणच त्याचं कार्य हे  वाखाणण्या जोगं आहे, परंतु  विद्यार्थी फक्त काही ग्रेड, आणि मार्कांसाठी च त्यांच्या उपक्रमांमध्ये सहभाग नोंदवताना दिसतोय.
      महाविद्यालयाच्या मर्जीतला विद्यार्थी हाच त्या महाविद्यालयाचा प्रमुख होऊन बसतो  मग त्याला विद्यार्थ्यांच्या प्रश्नाची जाणीव असो अथवा नसो सामाजिक विषय हाताळण्याच कौशल्य असो अथवा नसो फक्त महविद्यालय सांगेल ते करायचं इतक्या पुरताच तो मर्यादित राहून जातो, यातून तो स्वतःचा  विकास तर करतच नाही आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न हि सुटत नाहीत, मग कुठेतरी कायद्यामध्ये असा प्रमुख नेमावा म्हणून तरतूद केलेली आहे म्हणून नामधारीपणा त्याच्यामध्ये येतो. परवा अशाच एका महाविद्यालयामध्ये जाणं झालं, महाविद्यालयाच्या  फाटका जवळ गेलो तर ते बंद होतं. बंद असण्याचं कारण विचारल्यास समजलं कि त्या महाविद्यालयाच्या शिस्तपालन समितीने विद्यार्थ्यांनी वेळेवर महाविद्यालयात यावे यासाठी हा नियम बनवला होता मग ते फक्त विशिष्ट वेळीच उघडेल असा नियम तो होता, परंतु अनेको चळवळी चालणार्या त्या महाविद्यालयात प्रत्येकाची वेळ वेगळी ठरलेली मग तोपर्यंत विद्यार्थ्यांनी  एखाद्या कारखान्याच्या बाहेर  जशा मजुरांच्या रांगा लागतात तसे ताटकळत उभे राहायचं.
        कशामुळे हा विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये निसरडे पणा येतोय ? तर त्या महाविद्यालयाचा जो विद्यार्थी प्रमुख आहे त्याच्या  असणाऱ्या गप्प बशा भूमिकेमुळे, प्राचार्य बाईंनी त्याचं कौतुक करावे आणि ह्याने त्यांचे गुण गावेत एवढाच उद्योग… बाकी विद्यार्थ्यांनी कसं  शिक्षण घ्यायचं,त्याच्याशी यांना काही घेण देण नसतं, त्यामुळे विद्यार्थ्यांनी निवडून दिलेला प्रमुख नक्कीच सर्व गोष्टींची चिंता हि करेलच कारण त्याना निवडून दिलेलं असतं तो कोणाच्याही मर्जीतला नसतो.
         राहिली गोष्ट महाविद्यालयातील वातावरण बिघडेल याचा जो बाऊ केला जात आहे त्याची जबाबदारी हि तर सर्वस्वी त्या महाविद्यालयाची असतेच, जर अशा  परिस्थिती महाविद्यालयांना सांभाळता येत नसतील तर संबंधित प्रशासनातील व्यक्तींच्या जागी सक्षम व्यक्तींची निवड महाविद्यालयाने करावी.
     नाहीतर विद्यार्थ्यांना शिस्त लागावी म्हणून सरळ महाविद्यालयाचे  फाटक बंद करणारी इतकी भोळवट शिस्तपालन समिती असेल तर त्याजागी नक्कीच अशा महाविद्यालयांनी पर्यायाचा विचार करावा.
    आज महाविद्यालय निवडणुकांमधून सामान्य नेतृत्व समोर आल्याचं आपणास दिसतं ते २० वर्षा पूर्वीचे…  आजचे तरुण नेते हे जुन्या नेतेमंडळीचीच वंशावळ दिसते त्यामुळे सामान्य नेतृत्वाला कुठेच जागा दिसत नाहीत  आणि हीच जागा निर्माण व्हावी, नव्हे तर जमिनी स्तरावर काम केलेल्या लोकांना संधी मिळून, खऱ्या प्रश्नांची जाण त्यांना व्हावी- हे केंव्हा घडेल तर जेंव्हा हे तरुण महाविद्यालयीन जीवनात अशा गोष्टींचा अनुभव घेतील तेंव्हा ते आपल्या सामाजिक जीवनामध्ये कुठेतरी या सर्व गोष्टींना स्थान देतील आणि पर्यायाने देशाच्या सर्वांगीण विकासात जो लोकसहभाग महत्वाचा असतो त्याचा टक्का हा नक्कीच वाढेल.



अहमद मोहमद शेख पत्ता 
९६९९९९३६५७५

 

Friday, 28 November 2014

सार्क आणि भारत

आज भारताला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त होऊन जवळ -जवळ ६७ वर्षे उलटली आणि सोबतच आपला पारंपारिक सोबतीदार, शत्रू , बंधू ( वाचकांनी आपल्या सोयीनुसार नाव ठरवून घ्यावे) असा पाकिस्तान देश हि दुर्दैवाने अस्तित्वात आला , काही काळानंतर  पाकिस्तानमधून  बांगलादेश  वेगळा झाला .  पाकिस्तानच्या आधी किंवा अनेको वर्षांपूर्वी  अखंड भारत अस्तित्वात होता मग त्याच्यामध्ये  आत्ताचा भारत , अफगाणिस्तान ,पाकिस्तान, नेपाळ ,भूतान, ब्रम्हदेश ,बांगलादेश, मालदीव आणि श्रीलंका इत्यादी राष्ट्रांचा सामावेश होता. आजच्या सार्क (दक्षिण आशियाई प्रादेशिक सहयोग संघटना )च्या नावाखाली ब्राम्ह्देशाचा  अपवाद वगळता हि सर्व राष्ट्रे  एका छताखाली आणण्याचा प्रयत्न इंदिरा गांधी आणि बांगलादेशचे तत्कालीन प्रधानमंत्री  झियाउर रेहमान (ज्यांची नंतर हत्या झाली ) यांनी केला, ज्या वेळेस झियाउर रहमान भारत दौर्यावर आले म्हणजेच डिसेंबर १९७७ साली, त्यावेळेसचे भारताचे पंतप्रधान हे मोरारजी देसाई होते आणि या दोघांच्या चर्चेच फलित म्हणजे सार्क च्या निर्मितीचा पाया होय परंतु सर्व श्रेय हे इंदिराजींनाच देण्यात येते. हे पण तितकच सत्य आहे कि एप्रिल १९८१ साली कोलंबो इथे भरलेल्या सार्क च्या  पहिल्या संमेलनाच्या वेळेस त्या भारताच्या तत्कालीन पंतप्रधान होत्या आणि या एकत्रीकरणासाठी त्यांनी प्रयत्नही केले. त्या ठिकाणी दुसरे कोणीही असते  त्यांनीही तेच केले असते, उदा. आपले मोरारजी देसाई, ज्यांच्या कार्यकाळात हि बुद्धी चालवली गेली, इथे व्यक्ती विशेष नाहीये या भारत देशाचीच पुण्याई आहे कि सारे जग आपल्याकडे आकर्षित होताना दिसतेय, मग ते चांगल्या गोष्टींसाठी असेल किंवा वाईट,मग आपण इतिहासाची पाने चाळून  बघितलं किंवा वर्तमान बघा किंवा येणारे भविष्यही आपल्याच समोर आहे पण  याचा अर्थ असा होत नाहीये कि मी इंदिराजींच्या कार्यकर्तृत्वावर प्रश्नचिन्ह उभा करतो तरी पण हे सत्य आहे  असो ,
     ज्या  प्रमाणे लोहचुम्बकाचे  तुकडे परत एकमेकाकडे आकर्षिले जातात त्याच पद्धतीचे आकर्षण या अखंड भारताच्या भूमीमध्ये आहे, एखादा तुकडा जास्तच मातीमध्ये भरला असेल तर तो कदाचित कमी आकर्षित होतो किंवा समोरच्या तुकड्यानेही आपला दक्षिण  ध्रुव सामोच्याच्या असणाऱ्या दक्षिण ध्रुवाप्रमाणे केला कि मग ते परस्पर विरोधी होऊन परस्परांपासून दूर फेकले जातात, पण त्या मातीने माखलेल्या तुकड्याला स्वच्छ करून त्याचं आकर्षण वाढविण किंवा मग  दक्षिण आणि उत्तर ध्रुवांना एकत्रित करून त्यांना एकजीव करणं हे निश्चितच कठीण आहे पण अशक्य हि नाही कदाचित त्याला तितका वेळही द्यावा लागेल, पण त्यासाठी प्रयत्नांची सुरुवात तर केली पाहिजे आणि हेच दुर्दैवाने काँग्रेस ला जमलं नाही सार्क ची निर्मिती तर करून बसलो पण, याच्यातून नकळतपणे रा. स्व. संघाचा हेतू साध्य होतो कि काय  या भीतीपोटी सोयीनं याच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं फक्त सार्क च्या बैठकांना उपस्थिती दर्शवायची आणि आर्ध्याच्या वर मुद्दे बारगळायचे किंवा समोरच्याकडून तसं करवून घ्यायचं आजपर्यंत हे चालत आलं, इथून पुढे काय होईल माहित नाही पण परवाच्या काठमांडू मधल्या सार्क संमेलनात याचा प्रत्यय आला कि  भारत या गोष्टींना नक्कीच बदलू शकतो आणि त्याची नांदी म्हणजे सार्कसंमेलनामधलं कुणाच्याही दबावाखाली न येता आणि भीती न बाळगता केलेलं भाषण  किंवा व्यवहार, आणि शेवटी पाकिस्तानलाही समजावत केलेलं हस्तांदोलन. या संमेलनातन नक्कीच काही प्रस्ताव मान्य झाले आणि काही अमान्याही झाले हा वेगळा भाग…
                                                                                     


आज भारत पुन्हा उभारी घेतोय आणि हि उभारी घेत असतानाच सार्क सारख्या संघटनेला आणि त्यांच्या सदस्य राष्ट्रांना सोबत घेऊन हि भरारी घेणं गरजेचं आहे, आज हि राष्ट्रे भारताकडे मोठ्या आशेने बघतायत (पाकिस्तान वगळता) भारताने आज पर्यंत जगाला विचार देण्याचे कार्य केलं ज्याच्यावर आज जग उभं आहे, आणि त्याच विचारांना या सदस्य राष्ट्रांमध्ये रुजवणं आणि एकेकाला हातानला धरून सोबत घेऊन जाणं हि आज भारताची प्राथमिकता बनलीय जी कि आधी कुणाला महत्वाची वाटली नाही,पश्चिमी देशांनी आपापले गट बनवून त्यांचा विकास केला त्यांनी इतरांचा कधीच विचार केला नाही पण भारताला सार्क च नव्हे तर येणाऱ्या काळात सर्व जगाचं प्रतिनिधित्व करत पुढं जायचं आहे, कदाचित एखाद्या ला असं वाटतही नसेल किंवा माझं लिखाणही एखाद्या विशिष्ट विचारधारेकडे झुकताना दिसेल पण सुज्ञ नागरिक असल्याकारणाने जी विचारधारा शाश्वत आहे जिला सुवर्ण  इतिहास होता, आज जी जनमतामध्ये बहुमतात ठामपणे उभी आहे जिला उज्वल भविष्य आहे याचा विचार करता आणि अवघ्या जगाला आपल्या मध्ये, आपल्या प्रेमाने, करुणेने सामावून घेण्याची ताकद ज्या विचारांमध्ये आहे  मी त्याचाच  प्रथमदर्शनी विचार करेन आणि याच विचारधारेवर सार्क इथून पुढे  चालेल याचीही  शाश्वती आहेच … 


                                              अहमद शेख-९६९९९३६५७५

Wednesday, 5 November 2014

फराळ

"आ S S य…   आ S S य… " बंड्या जोर जोरात रडू लागला, तशी माय आतून ओरडली " आरं काय झालं आता बोंबलायला, आत्ताच फराळ दिलाय नव्हं " आणि परत पीठ मळत-मळत तोंडातल्या तोंडात पुटपुटू लागली       " आधीच दिवाळं  निघालया सणासुदीचं, सगळा पैका  खाण्या पेण्यातच उडतुया, आमच्या खाण्यात ह्यांच्या पेण्यात " बाहेरून परत रडण्याचा आवाज आला, तशी  माय पिठातला हात झटकत-झटकत आणि बडबड करीत उठून बाहेर आली " काय झालं रं, किती येळ झाला रडतुया " सुशी  नं  मारलं " बंड्या रडत - रडत बोलला." काय मारलं बघु " म्हणत ती त्याच्या डोक्यावरून हात  फिरवू लागली "आगा  बया केवढा मोठा टेंगुळ आलाया, आग ये भवाने काय  मारलं ग डोस्क्यात ह्याच्या " सुशी निरागस पणे बोलली " मला आदी त्यानं चकली फेकून मालली, म्हणून म्या लालू (लाडू) मालला "  माई डोक्याला हात लावत  पुटपुटली " आग बया , डालडा कमी पडला वाटतंय " तिनं सुशी च्या गालाला हात लावला . तिच्या गालावर  ओरखडे उमटले होते. तिनं दोघाच्या हातातून फराळाची ताटं हिसकावून घेतली "तुमचा मुडदा बशिवला,आन पाण्याशी खेळता व्हय रं निघा बाहीर " माई नं दोघांना बाहेर हाकलून काढलं . तशी गोबऱ्या गालाची सुशी मुसमुसत बाहेर ओट्यावर बसलेल्या बाबाकडे जाऊन बसली. आणि  बंड्या चड्डीला हात पुसत  बडबडला " आसं पण तुझं फराळ हाणामारी करायचंच हाय, खाय एकटीच मला नगु " बंड्या रागारागात खेळायला निघून गेला.
     "आवं आत येताव का जरा" माई वैतागून आतून ओरडली. बाबा छोट्या सुशीला घेऊन आत आला  " काय झालं, सकाळ सकाळ, तवा लैच तापलाय म्हणायचं " बाबा  न्हाणीत पान थुंकत थुंकत बोलला.  "आवं तापणार न्हायतर काय ? दिवाळी ला थोडं गोड ध्वोड बनीवलं, पोरं ठोरं खात्याल म्हनुनशिनी पर ह्येंना पण माज आलाया " " आग तुझं फराळ म्हंजी दगड धोंडं, आन ह्या नाजूक पोरांनी कसा गं खावा, तुझी आय म्हणली व्हती माझी पोर लय गुणाची हाय ,लय सुगरण हाय  " सुशीच्या गालावरून हात फिरवत फिरवत तो बोलला  आणि हसू लागला. तशी ती परत रागाला गेली " जरा जुगारावर पैका उडविण्या परिस घरात दिला असता तर  जरा खाण्यालायक तरी  झालं आसतं फराळ,  आता घ्या राहल्याली दातं पाडून "
     माई नं काटकसर करून दिवाळीचा सण साजरा केला होता. दिवाळीच्या पदार्थ मध्ये दरवर्षी प्रमाणे यंदाही लाडू कडक आणि चकल्या धारदार बनल्या होत्या , आणि दरवेळे प्रमाणे यावेळेस हि प्रयत्न करूनही लाडू, चकल्या खाता न आल्यामुळे बंड्या आणि सुशी मध्ये परत भांडण झालं, बाबाच्या जुगारी सवयीमुळं यंदाही घरात दिवाळी सुखासमाधाना शिवाय पार पडली होती , आपल्या कर्माला दोष देतं माई संसाराचा गाडा चालवत होती. तसा बाबाही जरी वरून आनंदी दिसत असला तरी आतून तो  दरवेळे प्रमाणे पश्चाताप करून घेत होता.

अशाच दिवाळ्या आमच्या गावाकडं साजऱ्या होतात, शहराप्रमानं आमच्या इकडे मिठायांची सरबत्ती होतं नाही , आमच्या माईकडं पैशांची चणचण असल्यामुळं  आमची  माई तूप तर सोडाच पण वनस्पती तूप देखील पुरतं वापरत नाही, दिवाळी ला कपड्याची खरेदी करायची असेल तर आमचा बाप ऊसाच्या तिसऱ्या  हप्त्याची वाट बघत असतो तो मिळाला तर ठीक, नाही तर मग अशीच निरागस पोरांकडे बघत बघत दिवाळी आमची निघून जाते. दोन दगडांच्या मध्ये फटाक्याची टिकली ठेऊन फोडल्यावर विलक्षण आनंद आमच्या पोरांना  मिळतो, सुट्ट्या लागल्या कि सायकलीच्या टायर सोबत खेळण्यातलाच आनंद या पोरांना परमोच्च असतो, घरातल्या परिस्थितीशी तडजोड करायला जर शिकायचं असेल तर आमच्या या गावाकडच्या माणसांकडे नक्की येउन पहा, सण असो वा  कोणताही क्षण त्यामध्ये गावाकडची माणसं आनंद शोधत असतात. महिन्याचा  पगार नक्की नसतो, उद्याची चिंता नसते आजच्या दिवसात ते रममाण असतात, मग ते  तमाशाच्या फडात पैसे उडविण्याचा आनंद असेल किंवा देवळाच्या पारावर बसून पत्ते खेळून वेळ घालवण्याचा आनंद असेल. त्यामुळे पै न पै चा  हिशोब घरात द्यायचा किंवा वेगवेगळ्या वस्तूंचे हप्ते फेडत बसण्याची संस्कृती अजून येथे उदयास आलेली नाही. मुळात म्हणजे घरातली महिला या सर्वांना अतिशय व्यवस्थितपणे  सांभाळत असते, तीच वेगवेळ्या कारणांसाठी बचत करत असते  . थोड्याशा कुर्बुरीवरून ती कधीच पतीला घटस्फोट  देत नाही, किंवा घेतही नाही आयुष्यभर असेल त्या  परिस्थितीत ती लहान थोरांपासून ते शेजाऱ्या पाजाऱ्यांना पण सांभाळून घेत असते. बाबासारखा माणूस बायकोच्या चार गोष्टी ऐकून पण घेत असतो कारण तो पण चुकला असेल तर पश्च्याताप तरी किमान करीत असतो…
       दिवाळीचा फराळ हे तर उदाहरण होतं .


                                                       अहमद शेख,
                                                     ९६९९९३६५७५