Tuesday, 20 October 2015

सोन्या भाग -१

धडाक-धडाक करीत खच खळग्यातून स्वतःच उडविलेल्या धुरुळ्यात टमटम गाडी येऊन थांबली, धाडकन मागचा फाळका पडला त्यातून चार मोठ्या शेळ्या एक गुबगुबीत बोकड, कोंबड्यांची एक डाल घेऊन किश्याचा आज्जा गाडीतून उतरला, काठ फाटलेलं धोतर, पांढरा मळकट सदरा तशीच पांढरी टोपी....लागलीच किश्यानही मागून उडी मारली. आज्यानं डोक्यावर डाल ठेऊन ती एका हातानं धरली आणि दुसऱ्या हातात चारही शेळ्यांच्या दोऱ्या आणि बोकडाची दोरी किश्याच्या हातात. बाजार आज तसा खच्चून भरला होता, बार्शीच्या आजू बाजूच्या शे-दीडशे खेड्यांचा बाजार इथे दर शनिवारी भरत असे. दोघांनी बाजाराचं मैदान तुडवायला सुरुवात केली
 ‘अय हेन्द्य्रा हिकडं तिकडं काय बघतुय बावरल्यावानी, बोकाड सुटलं बीटलं त पडोस्तर मारीन...नीट धर’ असं खारट तुरट ऐकून घ्यायची किश्याला सवयच होती शेवटी आज्ज्या शिवाय त्याचं पण या जगात दुसरं कुणी नव्हतं आज्जा तोंडाचा फटकळ पण तितकाच प्रेमळहि होता. किश्या भानावर येऊन जोरात ओरडला ‘व्हय, व्हय.. लई जाम धरलंय’ आणि आज्ज्याला पण माहित होतं बोकड रिकामं जरी सोडलं तरी ते किश्याच्याच मागे येणार. मागच्या वर्षी किश्या तिसरीत होता तेंव्हापासून किश्यानं त्याचा सांभाळ केलेला होता, प्रेमानं किश्यानं त्याचं नाव सोन्या ठेवलं होतं...म्हणून शाळेतली पोरं ठोरं सुद्धा किश्याला सोन्या बोकाड म्हणून चिडवायची, पण तरीसुद्धा किश्याचा आणि सोन्याचा लगाव कमी नाही झाला.
      पैशाच्या अडचणी आणि त्यातून किश्याच्या शाळेचा खर्च हे सगळं भागवण्यासाठी आज्ज्यानं शेळ्यांचा आणि कोंबड्यांचा सगळाच डोलारा विकायचं ठरवलं होतं त्यामध्ये सोन्यालाही विकावं लागणार होतं, म्हणूनच त्यानं बार्शीच्या बाजारात चांगला भाव भेटलं म्हणून सकाळ सकाळ बार्शी गाठली होती.
      भर बाराची वेळ झाली, शेळ्या आणि कोंबड्यांची डाल विकून झाली . आता फक्त राहिला होता तो म्हणजे किश्याच्या हातातला सोन्या बोकड..साधारणतः १८ ते २० किलो भरेल इतकं सोन्याचं वजन होतं दिसायलाही तास रुबाबदार आणि गुबगुबीत बाजारातल्या शेळ्या, मेंढ्या पाहून कावरा-बावरा झालेला सोन्या किशाच्या मागे चालता चालता शेळ्यांना छेडत होता.
‘ओ पाव्हणं, आवं त्या बोकडाला आवरा कि नीट लैच मजल्यावानी कारायलय’
शेळ्यांचा कळप घेऊन आलेल्या एका व्यापाऱ्यानं मागून आवाज दिला
‘आवं इकायाच आणलाय त्याला’
बोलता बोलता आज्ज्याच्या तोंडातून ‘मन की बात’ निघून गेली...
‘तुझ्या सोन्याला बार्शीचा बाजार फिरवून आणू’ असं सांगून तो किश्याला बाजारात घेऊन आला होता.
आपला आज्जा आपल्याला खोटं बोलला लक्षात येताच भावहीन चेहऱ्याने किश्या आज्ज्याकडे बघत होता...आज्जा तासाच नजर चुकवून पुढे चालू लागला, तशी हातातली दोरी किश्यानं घट्ट पकडली. तेवढ्यात सोनगावच्या पाटलांची नजर सोन्यावर पडली, पाटलांनी सरासरा चालत येऊन आज्ज्याला विचारलं ‘काय पाव्हणं कितीला दिलं बोकाड’ ‘इकायचं न्हाय ते’ किश्या ओरडला...आज्यानं किश्याच्या हातातली दोरी हिसकावून घेत पाटलांना विचारलं ‘तुम्हीच सांगा कि’
‘आवं आम्ही व्यापारी नाही बराबर किंमत कराया, तुम्ही कितीला दिलं ती सांगा, काय तरी कमी जास्ती करून सौदा करून टाकू कि,
‘चार हजार च्या खाली न्हाय द्यायचं बघा’
तिकडं सोन्याचं सौदा चालू होता आणि किश्याच्या डोळ्यांतून पाणी येत होतं...
‘ पाव्हणं,यापार नाही ह्यो, देवाला कापयाचय बोकाड, देवासाठी तरी जरा बेतात सांगा कि’
‘मग तुम्हीच मागा कि कितीला मागताय ती’
पाटलांनी सोबत आणलेल्या रामा च्या कानात काहीतरी कुजबुज केली..
‘एकच सांगतो साडेतीन देतो बघा’
‘आसं म्हंता, मंग सोडा बिरडं(जनावरांच्या गळ्यात विशिष्ट पणे बांधलेली दोरी), देवासाठी म्हनलाव म्हणून, बरं कुण्या देवाला हाय म्हणायची कंदुरी(मराठवाड्यात देवाला बोकडाचा बळी देतात..) तुम्ह्ची’
‘आवं दोन वरीस झालं, गडाला नवस केला व्हता बोरला पाणी लागावं म्हणून, आता काय टेन्शन नाय राह्यलं..मग फेडून टाकतो नवस एकदाचा’
रामा सोन्याच्या गळ्यातली दोरी सोडत होता आणि किश्या सर्व बोलनं ऐकत होता, त्याला समजत नव्हते कि पाटलांच्या बोरिंगला पाणी लागले म्हणून त्याच्या सोन्याचा बळी का जाणार ??
तसे या बाजारात असे अनेक किसना आणि सोन्या आलेले, आणि त्यांचीही अवस्था किश्या सारखीच होती. किश्याला माहित होतं कि सोन्या आपल्याला कधीच भेटणार नाही पण तो इतका समजूतदार होता कि आपल्या आज्याच्या परिस्थितीचीही जाणीव त्याला होती. सौदा झाला होता आणि डोळे पाणावले होते.रामानं सोन्याला उचलून जीप मध्ये टाकलं सोन्या ओरडत होता आणि किश्याच्या जीवाची लाही लाही होत होती. जीप भरकन निघून गेली दूर-दूर ...
किश्याच्या डोळ्यांच्या धारा बंद होत नव्हत्या, आज्जा किश्याची समजूत काढत होता आणि दोघेही बाजाराला पाठमोरे होऊन बस स्टेन्ड­चा रस्ता चालू लागले, दिवस थोडा पश्चिमेकडे झुकला होता
आणि मागे उरला होता बाजार शेळ्या-मेंढ्यांचा, काही जणांचे सौदे सुरु होते काहींना अजून गिऱ्हाईक भेटत नव्हते...

क्रमश: 

अहमद शेख
९६९९९३६५७५. 
ashaikh251@gmail.com