Sunday, 30 November 2014

महाविद्यालयीन निवडणुका

     लोकसभे पाठोपाठ , महाराष्ट्रातही सत्तांतरण झाले आणि नवीन सरकारवर नव्या आशा, अपेक्षांचे ओझे आले आणि ते त्यांनी ते पेलण्याचे प्रयत्न हि सुरु केले आणि अशीच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची  गेल्या वीस वर्षांपासूनची अपेक्षा म्हणजे महाविद्यालयातील निवडणुका  पुन्हा सुरु कराव्यात , कॉलेज मधला विद्यार्थ्यांचा कट्टा पुन्हा सुरु व्हावा , पुन्हा मोकळे वातावरण महाविद्यालयांमध्ये निर्माण व्हावे विचारांचे आदान-प्रदान व्हावे, कुणाच्याही दडपणाखाली न येता विद्यार्थ्यांनी कॉलेज कट्ट्यावर उभे राहून बिनधास्त भाषण करावे, आपल्या न्याय्य मागण्यांसाठी आणि हक्कांसाठी सोबतच महविद्यालय हे आपले घर समजून त्याचा विविध अंगांनी  विकास व्हावा याच्यासाठी कॉलेज प्रशासनासोबत चर्चा आणि वैचारिक वादहि  घालता यावा, त्यातून तो विद्यार्थी घडावा महविद्यालयीन जीवनात आलेले अनुभव त्याच्या पुढच्या सामाजिक, शैक्षणिक ,राजकीय किंवा तो ज्या क्षेत्रात जाईल त्या क्षेत्रात त्याला यशस्वी बनण्यास कामी यावेत, पर्यायाने  चांगला  नागरिक या देशासाठी लाभावा, महाविद्यालयातील सामान्य  नेतृत्व पुढे जाऊन आपल्या समाजाचे  व देशाचे  नेतृत्व व्हावे, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातली घराणेशाही संपुष्टात येऊन सामान्य नेतृत्व समोर यावे. राजकारण आणि समाजकारण याचं सामान्यीकरण व्हावे यासाठी महाविद्यालयीन निवडणुका पुन्हा सुरु व्हाव्यात या अपेक्षा घेऊन हि तरुणाई या नव्या सरकार कडे बघत असतानाच, सरकारनेही घोषणा करून टाकली कि पुढच्या वर्षी महाविद्यालयीन खुल्या निवडणुका होतील, आणि सगळीकडे विशेषतः  महाविद्यालय परिसर आणि राजकीय गोटात याची चर्चा रंगली. आता विषय असा आहे कि महाविद्यालयामध्ये निवडणुका व्हाव्यात का ? झाल्या तर का व्हाव्यात ?
      मुख्य म्हणजे तरूणांचं मुख्य केंद्र हे महाविद्यालय परिसर असते, वेगवेळ्या चळवळी चे केंद्र  हि महाविद्यालय परिसरच असते, आणि ज्यांच्या खांद्यावर भविष्याची  जबाबदारी असते असा तरुण घडण्याचं केंद्र हि महाविद्यालयच असते, पण आजकाल हा तरुण फक्त पुस्तकी स्वरुपात घडताना दिसतोय, सामाजिक जाणिवे बद्दल तो सतर्क असला पाहिजे, NSS  चे उपक्रम व कार्यक्रम  आणि एकूणच त्याचं कार्य हे  वाखाणण्या जोगं आहे, परंतु  विद्यार्थी फक्त काही ग्रेड, आणि मार्कांसाठी च त्यांच्या उपक्रमांमध्ये सहभाग नोंदवताना दिसतोय.
      महाविद्यालयाच्या मर्जीतला विद्यार्थी हाच त्या महाविद्यालयाचा प्रमुख होऊन बसतो  मग त्याला विद्यार्थ्यांच्या प्रश्नाची जाणीव असो अथवा नसो सामाजिक विषय हाताळण्याच कौशल्य असो अथवा नसो फक्त महविद्यालय सांगेल ते करायचं इतक्या पुरताच तो मर्यादित राहून जातो, यातून तो स्वतःचा  विकास तर करतच नाही आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न हि सुटत नाहीत, मग कुठेतरी कायद्यामध्ये असा प्रमुख नेमावा म्हणून तरतूद केलेली आहे म्हणून नामधारीपणा त्याच्यामध्ये येतो. परवा अशाच एका महाविद्यालयामध्ये जाणं झालं, महाविद्यालयाच्या  फाटका जवळ गेलो तर ते बंद होतं. बंद असण्याचं कारण विचारल्यास समजलं कि त्या महाविद्यालयाच्या शिस्तपालन समितीने विद्यार्थ्यांनी वेळेवर महाविद्यालयात यावे यासाठी हा नियम बनवला होता मग ते फक्त विशिष्ट वेळीच उघडेल असा नियम तो होता, परंतु अनेको चळवळी चालणार्या त्या महाविद्यालयात प्रत्येकाची वेळ वेगळी ठरलेली मग तोपर्यंत विद्यार्थ्यांनी  एखाद्या कारखान्याच्या बाहेर  जशा मजुरांच्या रांगा लागतात तसे ताटकळत उभे राहायचं.
        कशामुळे हा विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये निसरडे पणा येतोय ? तर त्या महाविद्यालयाचा जो विद्यार्थी प्रमुख आहे त्याच्या  असणाऱ्या गप्प बशा भूमिकेमुळे, प्राचार्य बाईंनी त्याचं कौतुक करावे आणि ह्याने त्यांचे गुण गावेत एवढाच उद्योग… बाकी विद्यार्थ्यांनी कसं  शिक्षण घ्यायचं,त्याच्याशी यांना काही घेण देण नसतं, त्यामुळे विद्यार्थ्यांनी निवडून दिलेला प्रमुख नक्कीच सर्व गोष्टींची चिंता हि करेलच कारण त्याना निवडून दिलेलं असतं तो कोणाच्याही मर्जीतला नसतो.
         राहिली गोष्ट महाविद्यालयातील वातावरण बिघडेल याचा जो बाऊ केला जात आहे त्याची जबाबदारी हि तर सर्वस्वी त्या महाविद्यालयाची असतेच, जर अशा  परिस्थिती महाविद्यालयांना सांभाळता येत नसतील तर संबंधित प्रशासनातील व्यक्तींच्या जागी सक्षम व्यक्तींची निवड महाविद्यालयाने करावी.
     नाहीतर विद्यार्थ्यांना शिस्त लागावी म्हणून सरळ महाविद्यालयाचे  फाटक बंद करणारी इतकी भोळवट शिस्तपालन समिती असेल तर त्याजागी नक्कीच अशा महाविद्यालयांनी पर्यायाचा विचार करावा.
    आज महाविद्यालय निवडणुकांमधून सामान्य नेतृत्व समोर आल्याचं आपणास दिसतं ते २० वर्षा पूर्वीचे…  आजचे तरुण नेते हे जुन्या नेतेमंडळीचीच वंशावळ दिसते त्यामुळे सामान्य नेतृत्वाला कुठेच जागा दिसत नाहीत  आणि हीच जागा निर्माण व्हावी, नव्हे तर जमिनी स्तरावर काम केलेल्या लोकांना संधी मिळून, खऱ्या प्रश्नांची जाण त्यांना व्हावी- हे केंव्हा घडेल तर जेंव्हा हे तरुण महाविद्यालयीन जीवनात अशा गोष्टींचा अनुभव घेतील तेंव्हा ते आपल्या सामाजिक जीवनामध्ये कुठेतरी या सर्व गोष्टींना स्थान देतील आणि पर्यायाने देशाच्या सर्वांगीण विकासात जो लोकसहभाग महत्वाचा असतो त्याचा टक्का हा नक्कीच वाढेल.



अहमद मोहमद शेख पत्ता 
९६९९९९३६५७५

 

No comments:

Post a Comment