Wednesday, 5 November 2014

फराळ

"आ S S य…   आ S S य… " बंड्या जोर जोरात रडू लागला, तशी माय आतून ओरडली " आरं काय झालं आता बोंबलायला, आत्ताच फराळ दिलाय नव्हं " आणि परत पीठ मळत-मळत तोंडातल्या तोंडात पुटपुटू लागली       " आधीच दिवाळं  निघालया सणासुदीचं, सगळा पैका  खाण्या पेण्यातच उडतुया, आमच्या खाण्यात ह्यांच्या पेण्यात " बाहेरून परत रडण्याचा आवाज आला, तशी  माय पिठातला हात झटकत-झटकत आणि बडबड करीत उठून बाहेर आली " काय झालं रं, किती येळ झाला रडतुया " सुशी  नं  मारलं " बंड्या रडत - रडत बोलला." काय मारलं बघु " म्हणत ती त्याच्या डोक्यावरून हात  फिरवू लागली "आगा  बया केवढा मोठा टेंगुळ आलाया, आग ये भवाने काय  मारलं ग डोस्क्यात ह्याच्या " सुशी निरागस पणे बोलली " मला आदी त्यानं चकली फेकून मालली, म्हणून म्या लालू (लाडू) मालला "  माई डोक्याला हात लावत  पुटपुटली " आग बया , डालडा कमी पडला वाटतंय " तिनं सुशी च्या गालाला हात लावला . तिच्या गालावर  ओरखडे उमटले होते. तिनं दोघाच्या हातातून फराळाची ताटं हिसकावून घेतली "तुमचा मुडदा बशिवला,आन पाण्याशी खेळता व्हय रं निघा बाहीर " माई नं दोघांना बाहेर हाकलून काढलं . तशी गोबऱ्या गालाची सुशी मुसमुसत बाहेर ओट्यावर बसलेल्या बाबाकडे जाऊन बसली. आणि  बंड्या चड्डीला हात पुसत  बडबडला " आसं पण तुझं फराळ हाणामारी करायचंच हाय, खाय एकटीच मला नगु " बंड्या रागारागात खेळायला निघून गेला.
     "आवं आत येताव का जरा" माई वैतागून आतून ओरडली. बाबा छोट्या सुशीला घेऊन आत आला  " काय झालं, सकाळ सकाळ, तवा लैच तापलाय म्हणायचं " बाबा  न्हाणीत पान थुंकत थुंकत बोलला.  "आवं तापणार न्हायतर काय ? दिवाळी ला थोडं गोड ध्वोड बनीवलं, पोरं ठोरं खात्याल म्हनुनशिनी पर ह्येंना पण माज आलाया " " आग तुझं फराळ म्हंजी दगड धोंडं, आन ह्या नाजूक पोरांनी कसा गं खावा, तुझी आय म्हणली व्हती माझी पोर लय गुणाची हाय ,लय सुगरण हाय  " सुशीच्या गालावरून हात फिरवत फिरवत तो बोलला  आणि हसू लागला. तशी ती परत रागाला गेली " जरा जुगारावर पैका उडविण्या परिस घरात दिला असता तर  जरा खाण्यालायक तरी  झालं आसतं फराळ,  आता घ्या राहल्याली दातं पाडून "
     माई नं काटकसर करून दिवाळीचा सण साजरा केला होता. दिवाळीच्या पदार्थ मध्ये दरवर्षी प्रमाणे यंदाही लाडू कडक आणि चकल्या धारदार बनल्या होत्या , आणि दरवेळे प्रमाणे यावेळेस हि प्रयत्न करूनही लाडू, चकल्या खाता न आल्यामुळे बंड्या आणि सुशी मध्ये परत भांडण झालं, बाबाच्या जुगारी सवयीमुळं यंदाही घरात दिवाळी सुखासमाधाना शिवाय पार पडली होती , आपल्या कर्माला दोष देतं माई संसाराचा गाडा चालवत होती. तसा बाबाही जरी वरून आनंदी दिसत असला तरी आतून तो  दरवेळे प्रमाणे पश्चाताप करून घेत होता.

अशाच दिवाळ्या आमच्या गावाकडं साजऱ्या होतात, शहराप्रमानं आमच्या इकडे मिठायांची सरबत्ती होतं नाही , आमच्या माईकडं पैशांची चणचण असल्यामुळं  आमची  माई तूप तर सोडाच पण वनस्पती तूप देखील पुरतं वापरत नाही, दिवाळी ला कपड्याची खरेदी करायची असेल तर आमचा बाप ऊसाच्या तिसऱ्या  हप्त्याची वाट बघत असतो तो मिळाला तर ठीक, नाही तर मग अशीच निरागस पोरांकडे बघत बघत दिवाळी आमची निघून जाते. दोन दगडांच्या मध्ये फटाक्याची टिकली ठेऊन फोडल्यावर विलक्षण आनंद आमच्या पोरांना  मिळतो, सुट्ट्या लागल्या कि सायकलीच्या टायर सोबत खेळण्यातलाच आनंद या पोरांना परमोच्च असतो, घरातल्या परिस्थितीशी तडजोड करायला जर शिकायचं असेल तर आमच्या या गावाकडच्या माणसांकडे नक्की येउन पहा, सण असो वा  कोणताही क्षण त्यामध्ये गावाकडची माणसं आनंद शोधत असतात. महिन्याचा  पगार नक्की नसतो, उद्याची चिंता नसते आजच्या दिवसात ते रममाण असतात, मग ते  तमाशाच्या फडात पैसे उडविण्याचा आनंद असेल किंवा देवळाच्या पारावर बसून पत्ते खेळून वेळ घालवण्याचा आनंद असेल. त्यामुळे पै न पै चा  हिशोब घरात द्यायचा किंवा वेगवेगळ्या वस्तूंचे हप्ते फेडत बसण्याची संस्कृती अजून येथे उदयास आलेली नाही. मुळात म्हणजे घरातली महिला या सर्वांना अतिशय व्यवस्थितपणे  सांभाळत असते, तीच वेगवेळ्या कारणांसाठी बचत करत असते  . थोड्याशा कुर्बुरीवरून ती कधीच पतीला घटस्फोट  देत नाही, किंवा घेतही नाही आयुष्यभर असेल त्या  परिस्थितीत ती लहान थोरांपासून ते शेजाऱ्या पाजाऱ्यांना पण सांभाळून घेत असते. बाबासारखा माणूस बायकोच्या चार गोष्टी ऐकून पण घेत असतो कारण तो पण चुकला असेल तर पश्च्याताप तरी किमान करीत असतो…
       दिवाळीचा फराळ हे तर उदाहरण होतं .


                                                       अहमद शेख,
                                                     ९६९९९३६५७५
 
   
         

3 comments:

  1. मित्रा ग्रामीण भागातील जीवनाचे चित्र डोळ्यासमोर उभं राहिल.

    ReplyDelete