Tuesday, 2 December 2014

कितपत पटतंय ?

काल पासून विविध वृत्तवाहिन्यांवर सुरु असलेल्या आणि आज  सकाळच्या वृत्तपत्रामध्ये वाचलेल्या बातमीने मन हेलावून  तर गेलेच पण तळपायाची आग देखील  थेट मस्तकी जाऊन भिडली, बातमी होती छत्तीसगढ मध्ये  सुकमा जिल्ह्यातील चिन्तनगुफ़ा येथे नक्षलवाद्यांनी १४ जवानांना ठार केले, अशा बातम्या आपल्या मुंबई - पुण्यामध्ये राहणाऱ्या लोकांसाठी कितपत महत्वाच्या आहेत किंवा ते अशा गोष्टींना कितपत गांभीर्याने घेतल्या जातात माहित  नाही, हा वेगळ्या संशोधनाचा विषय आहे.
     परंतु या बातम्या महत्वाच्या आहेत माझ्या गावाकडे राहणाऱ्या दोन एकर शेतीमध्ये गुजराण करणाऱ्या गरीब शेतकऱ्यासाठी , किंवा त्या वृद्ध शेतमजुरासाठी ज्यांचा एक मुलगा पोलिस सेवेमध्ये आहे, केंद्रीय राखीव पोलिस दलात आहे, किंवा  सीमेवर जो देशाचे रक्षण करतोय. आपला एक मुलगा कुठेतरी अशा नोकरीमध्ये आहे जिथे मृत्यू कधी येईल ते सांगता येत नाही.  तरीही हा बळीराजा देशाला आपल्या अन्नधान्याने पोसत असतानाचा देशाच्या संरक्षणासाठी आपल्या पोटच्या गोळ्यांना पण तो न्योछावर करतोय, त्याला माहित नाही नक्षलवादी कोण आहेत ? त्याला हे पण माहित नाही कि त्यांच्या विविध चालणाऱ्या चळवळी कोणत्या आहेत ? त्याला फक्त हे ठाऊक आहे कि नक्षलवादी नावाचे कुणीतरी देशविघातक कृत्य करणारे देशद्रोही या भारतात आहेत आणि आपला मुलगा त्यांच्याशी लढायला गेलाय किंवा तो त्यांच्याशी लढताना विरगतीस  प्राप्त झालाय, तो शहीद झालाय.
     आता मुद्दा असा आहे कि सरकारची मदत तर त्यांना मिळेलच पण साऱ्या समाजाचा ठेका उचलू पाहणाऱ्या स्वतःला समाजसेवी, सेवाभावी समजणाऱ्या संघटना आणि त्यांचे बुद्धिवादी शिरोमणी कुठे जातात अशावेळी  का ते या शेतकऱ्यांना किंवा या जवानांच्या नातेवाईकांना  भेटत नाहीत, का ते नक्षलवाद आणि त्यांच्या कारवायांवरती बोलत नाहीत ? " नक्षलवादी ठरवणारे तुम्ही कोण? " असा खडा सवाल विचारणारे पत्रकार का या संघटनांना त्यांच्या गप्प बशा भूमिकेबद्दल विचारत  नाहीत ? आझाद नावाचा नक्षलवादी जेंव्हा मारला गेला तेंव्हा लगबगीने हैद्राबादला गेलेल्या अरुंधती राय का त्या शहिदांच्या घरी भेट देत नाहीत? कुठे गेले कायदे पंडित ?कुठे गेले लोकायत वाले ? कबीर कला मंच का आता या विषयावर मैफिली बसवत नाहीत. या संघटनांना बळ देणारे आमक्या - तमक्याचे कैवारी गेले कुठे? अनेको  नावे आहेत , ती इथे उल्लेखली तर अनेकांच्या नाकाला मिरच्या झोंबतील. आणि म्हणतील हा विषय आमचा नाही मग भविष्यात यांनी परत नक्षलवादाचा कळवळा घ्यावा आणि कोणीतरी यांच्या मुस्काडात मारावी असे होऊ नये म्हणजे झालं .
     आम्ही शहरात राहणारे लोक नक्षलवादापासून शेकोडो मैल दूर आहोत हे खरं आहे पण त्यांच्या समर्थित संघटना(frontal organizations)आपल्या  दाराशी येउन उभ्या आहेत हे समजलं पाहिजे,नाही तर  सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यांमध्ये नक्षलवाद फोफावायला काहीच वेळ लागणार नाही आणि  आज जी परिस्थिती माझा वनवासी बंधू भोगतोय ती परिस्थिती आपल्यावरही यायला काहीच वेळ लागणार नाही. या समर्थित संघटनांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन नक्षलवादी शहरात पण घुसण्याचा प्रयत्न करताहेत. हा मुद्दा दुसऱ्यांदा मी उपस्थित करतोय कारण जितक्या वेळेस अशा घटना नक्षली भागात घडत असतात अशा वेळी या संघटनांचे छुपे समर्थन हे त्यांना असते, हे अनेक वेळा सिद्ध झालेलं आहे, आणि इथून पुढे ते आपल्या निदर्शनासही  येत राहील. त्यामुळे अशा संघटनांना विरोध म्हणजे चार ओळी लिहून किंवा कुठेतरी दोन चार शिव्या घालून मोकळे होणारे आम्ही नाही . अशा संघटनाचा आम्ही रस्त्यावर उतरून वेळप्रसंगी त्याचा विरोध केला आहे आणि पुढेही करत राहू .
    सरकार याबद्दल काय विचार करतंय माहित नाही पण अभाविप या विषयाला नेहमीच संवेदनशील पणे घेते.  मग सरकार पण या हात घालायला तयार नसेल तर आम्ही सरकारला तसं करायला भाग पाडू , हे बुद्धीचे ठेकेदार जरी गप्प बसले तरी आम्ही त्या वनवासी बंधूंना, त्या शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना नक्कीच  सहकार्य करू, सहानुभूती दाखवू .
     थेट व्यवस्थेच्या विरोधात शस्त्र घेऊन उभे रहायचे, मूळ चळवळी शी काहीही देणघेण न ठेवता भलेपणाचे सोंग दाखवून गळे चिरायचे आणि त्यांच्या या पापी धंद्यांना या बुद्धीवाद्यांनी समर्थन द्यायचं, आणि आपण हे सगळं मुग गिळून गप्प बसत हा तमाशा बघत बसायचा कितपत पटतंय लोकहो तुम्हाला ???

अहमद  शेख - ९६९९९३६५७५  

No comments:

Post a Comment