आज महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आणि सर्व पक्ष आपापल्या प्रचार कार्यात जोमाने लागले, विशेष म्हणजे जाहिरातबाजी करण्यासाठी एकही पक्ष मागे राहिला नाही. केलेल्या अथवा न केलेल्या कामाचा प्रचार अत्यंत प्रामाणिकपणे वेगवेगळ्या वाहिन्यांवरून होताना दिसतो आहे.
माझा महाराष्ट्र, आम्ही महाराष्ट्रवादी, छत्रपतींचा आशीर्वाद ,पवारसाहेबांच महिला धोरण, स्वछ कारभार इ . विशेषणे स्वतःला व महाराष्ट्राला लावली जात आहेत जनतेला न विचारता हे त्यापेक्षा विशेष. गम्मत म्हणजे ह्या जाहिराती एकापाठोपाठ दाखवल्या जातात एकाच वाहिनीवर. उदा पहिल्यांदा काँग्रेस ची जाहिरात येते- पृथ्वीराज चव्हाणांच्या माध्यमातून त्यामध्ये स्वछ कारभार हा राग स्वतः मुख्यमंत्री आळवताना दिसतात आणि ते स्वतः एका कागदपत्रावर सही करताना दिसतात, आणि आज लगेचच सावंतवाडीमध्ये नितीन गडकरी यांनी त्यांची खिल्ली उडवली म्हणे ‘आता सही दिसतेय ती फक्त जाहिरातीमध्ये’ आणि खरचं या जाहिरातीच्या निमित्ताने का होईना पण लोकांना कळली तरी कि मुख्यमंत्र्यांची सही आहे तरी कशी, लगेच त्यानंतर आम्ही महाराष्ट्रवादी म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसची जाहिरात येते त्यामध्ये मुंबईतले रस्ते, स्वच्छ फळबागा, पाण्याची सोय, मेट्रो, मुंबईचे विमानतळ आणि शेवटी त्यांचे नेते असे चित्र दाखवले जाते, मध्यंतरी कोणीतरी गमतीने म्हटले कि ‘द्राक्षांच्या बागांचे चित्रीकरण हे पंजाब मधले आहे आणि पवारसाहेबांचे महिला धोरण अजून त्यांच्याच नेत्यांना नीट समजले नाही आणि त्या बिचाऱ्या एअर होस्टेस ला काय समजणार ?’ लोकांमध्ये बराच काळ हशा पिकला.
असो, राष्ट्रवादीचे म्हणणे असे असावे कि पहिली जाहिरात दाखवलेली विसरा आणि आम्ही जे म्हणतो ते ऐका तेवढ्यात त्या TV स्क्रीन चा थोडासा भाग वर सरकतो आणि डाव्या कोपऱ्यात लिहिलेले असते ‘ आजचा रंग पिवळा (काळा, नीला,लाल जो असेल तो ) आणि भविष्याचा रंग भगवा ‘ अर्थातच हि जाहिरात शिवसेनेची आणि ती स्क्रीन मोठी होतानाच लगेचच भाजपची जाहिरात येते, त्यामध्ये एक बेकार तरुण ऑटो रिक्षामधून सरकारच्या नावाने खडे फोडत असतो ,एक वृध्द माणूस गळ्याला पट्टा लावून रस्त्यामध्ये पडलेल्या खड्ड्यांच्या शेजारी उभा राहतो आणि सरकारचा असली चेहरा दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि हि शेवटची जाहिरात जणू सांगतेय कि पहिले तिन्ही महाराष्ट्र सांभाळायच्या लायकीचे नाहीत आम्हाला संधी देऊन पहा.  त्यावर  शरद पवार म्हणाले कि ‘भाजप महाराष्ट्राची नकारात्मक प्रतिमा दाखवण्याचा प्रकार त्यांच्या जाहिरातीमधून करत आहेत’ मी तर दुसऱ्यांनी केलेली चांगली कामे दाखवली नसती कधी, पावरसाहेबांची काय इच्छा आहे ते काय कळायला मार्ग नाही. वेगवेगळ्या जाहिरातींमधून आपापल्या  पक्षाची प्रतिमा उंचावण्याचे काम त्या  त्या पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते करताना दिसताहेत निवडणुका जवळ आल्या कि हे कार्यकर्ते कामाला लागतात, मग ते थोडाही मागे वळून विचार करीत नाहीत की खरच आपल्या पक्षाची लायकी आहे का या जाहिरातीसाठी  पण ते का करतील कारण पक्षाशी निष्ठा असलेला तो कार्यकर्ता असतो, पक्षामध्ये त्याच्या मताला किती स्थान आहे हा वेगळा मुद्दा आहे खर म्हणजे त्याला स्वतःच असं वेगळ मत आहे कि नाही हा पण गमतीदार चर्चेचा विषय आहे, या जाहिरातबाजीमध्ये आपला पण फोटो कुठेतरी कोपऱ्याला का होईना पण लागला पाहिजे याची काळजी तो घेत असतो स्वतः डीजयानर च्या बाजूला बसून साहेबांच्या चेहऱ्यावरचे डाग अतिशय प्रामाणिक पणे तो साफ करत असतो, साहेबांच्या जाहिराती करत असताना स्वतःच्या मनातले त्यांच्याविषयीचे डाग पण तो साफ करत असतो कधीही सहवास न लाभलेल्या साहेबांच्या फलकावरील आपलं माणूस हे नाव उमटवताना कदाचित या कार्यकर्त्याचा उरही भरून येत असेल.
परत असो, ११ दिवसांनंतर या निवडणुकांची रणधुमाळी संपेल आणि त्यांच्या विकासाच्या जाहिरातीही बंद होतील, जिंकणारे जल्लोषात असतील तर हरणारे तोट्यात गेलेला हिशोब तपासत बसतील त्यामध्ये जाहिरातींचा खर्च हा प्रामुख्याने असणार, आजपर्यंत जे जे नेते होऊन गेले त्यांना जमिनीवरून वर नेण्याचा व वरून खाली आपटण्याचा पराक्रम जेवढा प्रसारमाध्यमांनी केला कदाचित तेवढा पराक्रम त्यांच्या विरोधकांनीही केला नसेल, अर्थातच याला काही मंडळी अपवादही असतील, पण हि सत्य परिस्थिती होय. या सर्व प्रसारमाध्यमांनी पाच वर्षात जेवढी कमाई केली नसेल तेवढी ते आत्ता या माध्यमातून करताना दिसताहेत. वर्तमान पत्रांमध्ये सुरुवातीच्या दोन पानांवर या वेगवेगळ्या पक्षांच्या जाहिरातींचा सूळसुळाट दिसतोय आणि या महाराष्ट्रातील निवडणुकींना खऱ्या अर्थाने रंगत आल्याची दिसतेय. अर्थातच या सर्वांमध्ये माध्यमांची भूमिका हि नेहमीप्रमाणेच महत्वाची ठरताना दिसतेय मग तो प्रचार खोटा असो वा खरा शेवटी हि जनताच ठरवेल कि कोण या महाराष्ट्रावर आपली सत्ता गाजवेल.
आणि ज्या जाहिराती त्यांनी निवडून येण्यासाठी बनवल्या आहेत त्याच जाहिरातींमुळे त्यांचा हशा पिकू लागल्याचे चित्र आपल्याला दिसते ते म्हणजे "कुठे  नेउन ठेवलाय, महाराष्ट्र माझा. " या जाहिरातीमधून.  काँग्रेस  ने  महराष्ट्रा ची केलेली प्रगती दाखवण्यासाठी "सर्वात पुढे महाराष्ट्र , महाराष्ट्र माझा " या जाहिरातीची निर्मिती करताच त्याला प्रत्युत्तर म्हणून "कुठे नेउन …" ची जाहिरात बनवली आणि सोसिअल मिडिया वर प्रचंड प्रमाणात याची खिल्ली उडवायला सुरुवात केली " वडापाव वरून गर्लफ्रेंड ,बर्गरवर  गेली अरे कुठे नेउन ठेवलाय महाराष्ट्र माझा " अशा प्रकारांच्या विनोदांचा सुळसुळाट सुटलाय. अर्थातच याचा जबर फटका काँग्रेस ला बसणार हे नक्कीच. आणि हि जाहिरात बनवणाऱ्या पियुष पांडे यांचेही अभिनंदन केले पाहिजे .    
आज या जाहिराती नाईलाजास्तव सांगताहेत कि बाबांनो ह्या उमेदवाराच्या चेहऱ्याकडे बघून मत नाही दिलं तरी चालेल पण आमच्या कडे बघून तरी या कपाळ करवंट्यानां निवडून द्या. आमच्यावर घेतलेली मेहनत बघून, आमच्यात भरलेलं संगीत बघून, सुंदर चित्रीकरण बघून (मग ते महाराष्ट्रातलं नसलं तरी चालेल), आमच्या मध्ये भरलेले भाव बघून, आमच्यावर लावलेले भाव बघून, शब्दांची मोडतोड करण्यासठी घातलेले घाव बघून, आमच्या द्वारे दिसणारे या चोरांना,साव बघून यांना निवडून आणा आणि एकदाची काय ती लोकशाही परंपरेला पार पाडा.त्यामुळे नेते मंडळींची मानसिकता अशी दिसून येते कि “आम्ही कसेही असो आमची जाहिरात जिगरबाज असावी”.

                                                                                                  अहमद  शेख .