Tuesday, 6 September 2016

किस्से स्वप्नातल्या आयुष्याचे

एक स्वप्न...
अवघा १७ वर्षांचा होतो मी..
आणि माझा मामा माझ्यापासून दूरावला गेला, कायमचा...
परत कधीही न येण्यासाठी
कँसरने ग्रसित माझा मामा डॉक्टर होता, डॉक्टरांना कुठलाही रोग होत नाही, हा माझा समज खरंच काल्पनिक होता. माझ्या आईचं त्याच्यावर खूप प्रेम...तीचा धाकटा भाऊ होता तो. रक्ताची उलटी होऊन अखेरचा श्वास घेतला त्याने, बरेच दिवस लागले आईला या धक्यातून सावरायला...
आयुष्याच्या मुख्य वळणावर माझं आदर्श व्यक्तिमत्व, माझं छत्र हरवलं...
छोटसं कुटूंब होतं त्याचं, बायको, १० वर्षांचा 
एक मुलगा, एक मुलगी १४ वर्षांची
इनफॅक्ट मी त्याच्या मुलीवर प्रेमही करायचो, दर शनिवार-रविवार आमच्या गावाला यायचे ते..
आणि मी तिच्यासाठी तिच्या प्रतिक्षेत लिहिलेल्या आठ दिवसांच्या ढिगभर कविता तिला ऐकवायचो...
कधीही व्यक्त न केलेलं अबोल प्रेम होत ते, परंतु खऱ्या अर्थानं बहरलेलं. आजही गुलाम अलींच्या गज़लांमध्ये ती अवतरलेली दिसते मला, वायोलिनच्या सूर तरंगांमध्ये लाजून हसणारा तिचा मुखडा लुप्त होताना दिसतो मला...विणेसारखी निरागस आणि संतुरा सारखी चंचल-अविचल, टपोर जांभूळ डोळे, तेजोमय कांती, तो सूर्य काजळ संध्येत बुडताना दिसतोय मला...
मामी उर्दु शाळेत शिक्षिका होती, मामा गेल्यानं ती एकटी पडली आणि दोन वर्षांनी तीनं दुसरं लग्न केलं, शरियत मधली तरतूद तिच्या पथ्यावर पडली, कुणालाही न विचारता किंवा विश्वासात न घेता लग्न केल्यामुळे कडाक्याचं भांडण झालं. संबंध कायमचे तुटले.. आणि माझं प्रेमही माझ्यापासून विभक्त झालं, कदाचित कायमचं... जाता- जाता विरह नावाचा एक नवा विषय देऊन गेलं... कवितेसाठी, माझ्यातल्या प्रतिभा फुलण्यासाठी...असो,
आम्हाला शेती जेमतेम पावणे सहा एकर, वडील शेती करायचे. शेतीला जोडधंदा म्हणून सायकलच्या दुकानापासून ते दारूच्या भट्टीपर्यंत सगळे उद्योग केले, पण स्वतः दारूच व्यसन सोडलं नाही. दारुमुळे घरात अठराविश्वे दारिद्र्य.  तसं ते आमच्या पाचवीलाचं पुजलेलं... बहीणीचं लग्न 
कसंबसं लावून दिलं, तिचं सुदैव म्हणून ती चांगल्या घरात गेली. आमच्या पाचपैकी आम्ही चौघेच राहीलो. एकतर शेती परवडेना त्यात भावकी सोबतचे वाद, म्हणून बापानं स्वत:च्याच घरात गळफास लाऊन घेतला. मी दरवाजा उघडला तर समोर बाप फासावर लटकलेला, काय करावं काय सुचेना.. तोपर्यंत मागून आई आली आणि पुढे जे काही झालं ते आजही किंवा इथून पुढेही कदाचित  मी शब्दबध्द करु शकणार नाही... खऱ्या अर्थानं अवलिया माणूस म्हणजे माझा बा...या अवलियाचं आयुष्यही तितकचं गमतीदार आणि रंजक. कधी फ़ुरसत मध्ये सांगेन... 
माझा एक मित्र होता प्रमोद नावाचा. लहानपणीच वडीलांचं प्रदीर्घ आजारानं निधन झालं. एक बहीण जिचं लग्न झालेलं होतं. घरात आई आणि हा, दोघेच जण. माझ्यापेक्षा पाच वर्षांनी मोठा, प्रचंड हुशार आणि महत्वकांक्षी. गरिबीमुळं दहावी नंतर पाच वर्षांचा गॅप पडला, पण शिकण्याच्या जिद्दीमुळं पाच वर्षांनंतर अकरावी ला प्रवेश घेतला आणि तो माझ्या वर्गात आला. बार्शीत माझा रुम पार्टनरही झाला. आम्ही सगळी आगाव पोरं, पण त्यानं आयुष्यात बऱ्याच खस्ता खाल्यामुळं तो गांभीर्यानं अभ्यास करत असे. तरी पण एका मुलीवर प्रेम करून बसला. आणि "तु कर भावा मी हाय" असली आमची फुशारकी आम्हालाच महागात पडली. कळालं पोरीचा मामा बार्शीतला एक नंबरचा गुंड. परम्यासकट आम्हीपण मार खाल्ला, आणि चौथ्या दिवशी रुमही सोडावी लागली.  
परत आयुष्यात कधीही असली लफडी करण्याचा कुणाला सल्ला दिला 
नाही. बारावी कशीबशी पार पडली. मला ७७ तर प्रमोदला ८० टक्के एवढे गुण २००८ साली मिळाले. त्याचा डी.एड ला नंबर लागला तर आम्ही सिव्हील ड्राफ्ट्समन चा डिप्लोमा  आणि मुक्त विद्यापीठतून बी.ए करु लागलो. दरम्यान  मुंबईपर्यंत पोहोचलो, एके दिवशी असाच सहज कार्यालयात बसलो असताना गावातून फोन आला प्रमोदनं आत्महत्या केली, शेतामधल्या आंब्याच्या झाडाला गळफास घेतला होता त्यानं. गरिबी आणि दारिद्र्यातून बाहेर निघण्याचा अयशस्वी प्रयत्न म्हणजे प्रमोदची आत्महत्या होती. 
माझा एक भाऊ होता दररोज संध्याकाळी न चुकता मला फोन करणारा, दर आठवडा हजार-बाराशे रुपये माझ्या अकाउँटमध्ये पाठवणारा. त्याचा संसार सुखात सुरु होता. माझ्यापेक्षा मोठा भाऊ. काका विहरीत पडून वारले म्हणून तो बायको लेकरासह मोटारसायकलवर पुण्याहून आला होता. विधी आटोपून बायकोला आणि सासऱ्याला बसमध्ये बसवून पुण्याच्या दिशेने निघाला इंदापूर नावाच्या गावाजवळ समोरुन येणाऱ्या भरधाव ट्रकने धडक दिली छातीला जबर मार बसला, रुग्णवाहीकेमधून इस्पितळात जात असतानाच त्याला मृत्यूनं कवाटाळलं कदाचित त्या क्षणी मी त्याच्या सोबत राहीलो असतो तर... असं म्हणतात शेवटच्या क्षणी तो काहीतरी बोलला. माहीत नाही काय बोलला, पण नक्कीच मरतानासुध्दा त्याचं ह्रदय आमच्यासाठी द्रवले असणार, तो रडला असणार आमच्या काळजीत, पण त्याला काय माहीती, की कुणाच्या मृत्यूनं किंवा दुरावण्यानं जग थांबत नाही. घड्याळाचे काटेही थांबत नाहीत. आम्ही आमच्या घरात आता दोघेच उरलो आम्ही पण नाही थांबलो, मी मुंबईत परत आलो आई बहीणीकडे गेली, गेल्या वर्षभरापासून वाट बघतोय त्याच्या फोनची, पैसे पाठवलेल्या मेसेजेसची.... घर आता एकटं पडलयं, भेगाळलयं. ज्या घरात क्रिकेट पाहण्यासाठी अख्खा गाव यायचा,ते घर अंधारात बुडून गेलय कधीच. मला आठवतोय तो, टी-ट्वेंटीचा पहिला वर्ल्ड कप, श्रीसंत ने मिसबाहचा अचूक टिपलेला झेल. काय जल्लोष केला होता आम्ही... आयुष्यात पुन्हा अशा जल्लोषाची कधी वेळच आली नाही ... आमच्या बापाला बुध्दीबळाचा आणि क्रिकेटचा फारच छंद आपसूकच आमच्यातही तो उतरला. ज्या अंगणात दिवस रात्र बुद्धीबळाचे डाव रमायचे, असं ऐकलयं तिथे फक्त पालापाचोळा आणि धुळ शिल्लक राहीलीय. अनेक दिवसांची धावपळ करुन हत्ती,घोडे, सोंगट्या सर्वजण दमून भागून भिंतीमधल्या  एका कपाटामध्ये निपचित पडले आहेत. एकेकाळी एकमेकांवर आक्रमण करणारे, एकमेकांचे रक्त वाहण्यासाठी आसुसलेले हे काळे-गोरे हत्ती, घोडे, सोंगट्या आपापल्या तलवारी म्यान करुन मिळून मिसळून रहातायत असं ऐकलय मी. त्यांच्यावर धुळ चढलीय, आळशी झालेत सर्व. शौर्य, रण, रणांगण, वीरत्व, स्वाभिमान, कणा इत्यादी गोष्टी त्यांच्यात आता तसूभरही शिल्लक नाहीत, आणि यामुळेच त्यांचा अंत जवळ आलेला आहे, हे लक्षात येत नाहीये त्यांच्या... माझ्या अनपेक्षित अंताला मी कुणालाच जबाबदार धरु शकत नाही, पण या योध्द्यांचा करुण अंत झाल्यास कदाचित ती जबाबदारी माझीच असेल. कधी कधी मी माझ्यावरच हसतो, नाही नेहमीच..
मुंबई नावाच्या मायानगरीत नशीब घेऊन फिरतोय, सोबती आहेत बरेच हितचिंतक. समुद्रकिनारी, काळ्याभोर रस्त्यांवर, कधी गर्द वनराईत, तर कधी लोकलमध्ये, मी मुंबईतल्या गर्दीत शोधतोय एखादा चेहरा भावासारखा-बापासारखा-प्रमोदसारखा, मामा सारखा त्याच्या मुलीसारखा... कान देऊन ऐकतोय सगळे आवाज, सगळ्या सार्वजनिक सुचना, गणपतीची गाणी, आरत्या, मशिदींवरची अजान.....  सगळं... सगळं  काही ऐकतोय, या आशेनं, की एखादा आवाज ऐकू यावा ओळखीचा...
 फार भयानक स्वप्न पडतात मला, कुणालाही पडू नयेत अशी स्वप्न... स्वप्नाला वास्तव समजणारे बघितले, पण वास्तवाला स्वप्न समजून जगणारे खचितच, त्याच परंपरेतला मीही...पुन्हा भेटुच नवीन स्वप्नासह....


8 comments:

  1. अहमद...आयुष्याच्या संध्याकाळच्या अस्तित्वाची जाणीव होते...हे वाचल्यावर..तुझी सर्व स्वप्ने पूर्ण व्हावीत ही सदिच्छा...

    ReplyDelete
  2. आपकी जिंदगी कि हर तकलीफ से वाकिफ हूं... आप जिस वक्त ये सब लिख रहे तब दिल में चुपायें आंसुओ को बहता देखा है मैने. हर बार रोने से रोकने कि कोशिश करता था आज नही कि ताकी आप अपने दिल को ख्स खोलो. आज दिल के इहसास को लफ़जो में बयां किया तुने बिलकुल ख्वाबो को हि तराह.... जिस भाई कि तलाश कर रहे हो वो भाई बनना चाहता हु, किसी कि जगह नही ले सकता खुद कि एक नई जगह आपकी जिंदगी मी रोशनी का एक नया आफताब लाना चाहता हूं.... भाई जो हुआ उसको बदल तो नही सकता मगर आपके हमेशा 7 रहुंगा इतना वादा आज कर सकता हूं...

    ReplyDelete
  3. जळगाव च्या प्रतिभा संगमात पाहिलेला एक कार्यकर्ता ,जो तिथले मला आठवतं कार्यक्रमातील कार्यालयाच काम सांभाळत होता ,बघताक्षणी तुम्हा आम्हां सारखाच वाटणारा, कुर्ता घातलेला ,शांत (शांत शब्द आला म्हणजेच ज्याच्या मनात विचारांचा काहूर माजलेला असू शकतो ते व्यक्त कोणत्या शब्दात करावं त्या शब्दांचा शोधात असलेला),कार्यमग्न, खऱ्या अर्थाने न उमगलेला अवलियाच .

    ReplyDelete
  4. अहमद जे आयुष्यात घडतं ते तर आपण रोखू शकत नाही, पण जे घडत ते आयुष्य भर हृदयाला चटके देऊन जात.मी येव्हडच म्हणेल दुःख माझ्या हि जीवनात अपार आहेत,तरी मी हसत राहतो, तू पण हसत राहावंसं,

    ReplyDelete
  5. Koyi jiye to apke tarah jiye....itna kuch ho jane ke bad bhi chehre par muskan aur apke kamyabi ko hamara salute..

    ReplyDelete
  6. This comment has been removed by the author.

    ReplyDelete